२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना आम्ही सत्तेत येऊ असे वाटले नव्हते. त्यावेळी काही जणांनी आश्वासने द्यायला सांगितली. आम्ही एवढी आश्वासने दिली की ती आता आठवतही नसल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला होता. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गडकरींवर टीका केली होती. दरम्यान नितीन गडकरी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राने चुकीची बातमी छापली असून यावरुन राहुल गांधींना लक्ष्य केलं. राहुल गांधींनी आधी मराठी शिकून घ्यावं असा टोला लगावला आहे. राहुल गांधींना कधीपासून मराठी कळायला लागलं असा खोचक सवालही त्यांनी यावेळी विचारला.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सल पाहुणे, इरसाल नमुने’ या कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली होती. यावेळी नितीन गडकरी यांनी ‘आम्ही सत्तेत येणार नाही याची खात्री होती. त्यामुळे आम्ही आश्वासन देत सुटलो. आता आम्हीच त्या आश्वासनांवर हसतो आणि पुढे जातो’, असा खुलासा केला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गडकरींचा हा व्हिडिओ ट्विट करत टीका केली होती. ‘भाजपाने जनतेच्या स्वप्नांचा आणि विश्वासाचा सत्तेच्या हव्यासापोटी बळी दिला आहे’ असं त्यांनी म्हटलं होतं. यावर नितीन गडकरी यांनी खुलासा दिला आहे.

२०१४ मध्ये सत्तेत येण्याची खात्री नव्हती, त्यामुळं आश्वासनं दिली: नितीन गडकरी

काय म्हणाले नितीन गडकरी –
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी टोलमुक्ती करण्याची घोषणा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मी त्यांना अशी घोषणा करु नका, आर्थिक दृष्टीने यामध्ये खूप अडचण येईल असं सांगितलं होतं. यावर त्यांनी मस्करीत मला म्हणजे तुम्हाला आपलं राज्य येईल असा विश्वास आहे असं म्हटलं. त्यावर मी आलं तर आपल्याला पूर्ण करावं लागेल असं म्हटलं.

अनेक वर्ष विरोधी पक्षात असल्याने जेव्हा आम्ही जाहीरनामा तयार करायचो तेव्हा अनेक घोषणा करायचो, कारण आम्हाला सत्तेत असण्याचा अनुभव नव्हता. हा संपूर्ण कार्यक्रम मराठीत होता.

दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तपत्राने पूर्ण निराधार वृत्त छापलं. त्यावेळी मी ना मोदींचं, ना भाजपाचं नाव घेतलं, ना मी 15 लाखांचा उल्लेख केला. त्यांनी ही बातमी छापल्यानंतर राहुल गांधींनी ती शेअर केली.

राहुल गांधींना कधीपासून मराठी कळायला लागलं, त्यांनी कोणाकडून तरी मराठी शिकून घेतलं पाहिजे. काहीच न समजता त्यांनी माझं ट्विटरवर अभिनंदन केलं. जे मी बोललोच नव्हतो.

मी दिलेली आश्वासनं पूर्ण करतो आणि ती केली आहेत. कार्यक्रमात जो टोलचा उल्लेख झाला ते आश्वासनही महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलं आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली. ना तिथे मोदींचं नाव होतं, ना भारत सरकार, ना 15 लाखांचा उल्लेख होता. कृपया तुम्ही चुकीच्या बातम्यांनी प्रभावित होऊ नका.