पूर्वी नागपूर महापालिकेची अवस्था अशी होती की त्यांच्याकडे विष घ्यायला पैसे नव्हते मेट्रोसाठी लाखो रुपये ही महापालिका कुठून देणार? असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं. गुरुवारी नागपूर मेट्रोचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. नागपूर महापालिकेची एकेकाळची स्थिती काय होती तेच त्यांनी आपल्या भाषणातून सांगून टाकलं. नागपूर महापालिकेकडे साडेचारशे कोटी मागणी करण्यात आली होती. मात्र साडेचार लाख रुपये देण्याचीही महापालिकेची ऐपत नव्हती असं नितीन गडकरी यांनी परखडपणे सांगून टाकलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतून रिमोट कंट्रोल या मेट्रोचं लोकार्पण केलं. याच कार्यक्रमात गडकरी बोलत होते. नागपूर मेट्रोसाठी कोट्यवधी रुपयांची गरज होती. मात्र महापालिकेकडे तेवढे पैसे कुठून येणार? त्यामुळे महापालिकेच्या मोक्याच्या जागांवर असलेली अतिक्रमणं हटवून आम्ही १५० कोटींची जागा मेट्रोसाठी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागला असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

पहा व्हिडिओ

देशातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांमध्ये नागपूर मेट्रो ही सर्वात इनोव्हेटीव्ह असल्याचा दावाही त्यांनी केला. या मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरच्या विकासाला दिशा मिळेल असंही ते म्हणाले. अन्य काही कामांमुळे मला यावेळी नागपूरला येता आलं नाही मात्र दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला नक्की येईल असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधानांना दुसऱ्या टप्प्यासाठी नागपूरला येण्याचं आवाहन केलं होतं.