काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष शिवसेनेसोबत कोणत्या विचाराने गेले ते कळतच नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी केलं आहे. ” काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना शिवसेनेच्या विचारांमध्ये कोणती प्रेरणा मिळाली ते समजतच नाही. कुठला विचार कुणाला पटला? हा प्रश्न तर मलाही पडला आहे. मला तर असा कोणताही धागा कुठे दिसला नाही. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत कोणत्या विचाराने गेले ते कळतच नाही.”असाही टोला गडकरी यांनी लगावला आहे. एबीपी माझा व्हिजन महाराष्ट्राचं या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“या देशात मतभिन्नता हा विषय नाही. मतभिन्नता असली तर हरकत नाही मनभेद असता कामा नये. मतभिन्नतेपेक्षाही घात करते ती विचारशून्यता. माझा विचार आहे, माझी संघटना आहे मी एकवेळ जीव देईन पण नाही जाणार काँग्रेसमध्ये. हा माझा विचार आहे. कारण माझी निष्ठा पक्की आहे. राजकारण हे क्रिकेटसारखं असतं कधी कधी चांगला खेळाडू लवकर आऊट होतो आणि नाईट वॉचमन ५० च्या वर धावा करतो. कधी कधी तुम्ही का जिंकलात आणि कधी कधी तुमचा पराभव का झाला याची कारणं देता येत नाहीत. आम्ही राजकारणात आलो ते काही भगवे कपडे घालून प्रवचन द्यायला नाही आलो. सत्तेत जाण्यासाठी आलो. एखादा मुलगा जेव्हा एखाद्या मुलीवर प्रेम करतो त्यावेळी Every thing is fair in love असं म्हणतात ना? तो नियम राजकारणातही लागू पडतो.” असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरी यांना उद्धव ठाकरे यांच्याबाबतही प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी गडकरी म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी पक्षाला काय दिशा द्यायची हा त्यांचा निर्णय आहे. मात्र ही जी दिशा त्यांनी स्वीकारली आहे ती त्यांनी विचारपूर्वक स्वीकारली असावी. मात्र बाळासाहेब ठाकरेंनी जो हिंदुत्वाचा विचार मांडला होता, ज्या कारणासाठी त्या काळात प्रमोदजी आणि बाळासाहेब यांनी युतीचा निर्णय घेतला होता. तो विचार आणि आज उद्धव ठाकरे करत असलेला विचार यामध्ये तफावत आहे. त्यामुळे कधी ना कधी उद्धव ठाकरेंना याची अडचण होणार आहे. मला उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता तेव्हा त्यांनी मला विचारलं तुम्ही नाराज आहात का? मी म्हटलं बिलकुल नाही. कारण राजकारणात या सगळ्या गोष्टी सुरुच असतात. बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान माझ्या मनात आहे. राजकारणात विचारधारेपेक्षा, सिद्धांतापेक्षा जेव्हा सत्ता महत्त्वाची ठरते तेव्हा अनैसर्गिक आघाड्या होतात त्या फार काळ टीकत नाहीत असं इतिहास सांगतो. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या मूळ विचारधारांमध्ये फरक आहे. त्यामुळे ही आघाडी फार काळ टीकेल कारण अशा आघाड्या टीकत नाही हे देशाच्या राजकारणात वारंवार दिसून आलं आहे आहे” असंही गडकरींनी म्हटलं आहे.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari criticized shivsena congress and ncp in interview scj
First published on: 22-02-2020 at 20:40 IST