केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा सांगितला. नागपूरमधील दक्षिणामूर्ती मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये गडकरींनी नागपूरकरांशी मनमोकळेपणे गप्पा मारल्या. यामध्ये त्यांनी अनेक मजेदार किस्से सांगितले. अगदी अमिताभ बच्चन यांनी केलेला फोन कट करण्यापासून ते मराठी खाद्यपदार्थांबद्दल अनेक विषयांवर गडकरींनी गप्पा मारल्या.

‘मी एकदा अमिताभ बच्चन यांचा फोन कट केला होता’ या वाक्याने सुरुवात करत गडकरी यांनी बच्चन यांच्याबद्दलचा एक मजेदार किस्सा नागपूरकरांना यावेळी बोलताना ऐकवला. ‘सुरुवातीच्या काळात माझी आणि अमिताभ बच्चन यांची फारशी ओळख नव्हती. त्याच काळात एकदा अमिताभ यांनी मला फोन केला. फोनवरील व्यक्तीने पलिकडून हॅलो, मैं अमिताभ बोल रहा हूँ असं सांगितलं. त्यावेळी मला कोणीतरी माझी मस्करी करत असल्यासारखे वाटले,’ असं गडकरींनी त्या फोन कॉलबद्दल बोलाताना सांगितले. या फोन कॉलला आपण एकदम मजेदार उत्तर दिल्याचे सांगतानाच पुन्हा अमिताभ यांचा फोन आल्यानंतर आपण चुकल्याचे लक्षात आल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले. ‘कोणीतरी मस्करी करत असल्याचे समजून मी, नाटक मत कर चल फोन रख असं म्हणत फोन कट केला. मात्र थोडा वेळात मला परत फोन आला आणि परत तोच आवाज ऐकू आला. मी खरोखरच अमिताभ बच्चन बोलत असल्याचे पलिकडच्या व्यक्तीने अगदी गांभीर्याने सांगितल्यानंतर मला चूक लक्षात आली,’ अशी आठवण गडकरींनी या कार्यक्रमात सांगितली.

अमिताभ यांच्यासंदर्भातील हा किस्सा सांगितल्यानंतर त्यांनी खाद्यसंस्कृतीबद्दल भाष्य केलं. दिल्लीमध्ये अनेक बड्या व्यक्ती आमच्याकडचे पदार्थ चाखण्यासाठी आवर्जून घरी येतात असंही त्यांनी सांगितलं. मराठी पदार्थांची चव चाखण्यासाठी अनेक दिग्गज मंडळी माझ्या घरी येतात असं सांगतानाच गडकरींनी कोणला काय आवडते याबद्दलची माहितीही उपस्थितांना दिली. यामध्ये अगदी अभिनेता जॅकी श्रॉफ माझ्या घरी आला तेव्हा वरण प्यायला होता, सलमान खान पोहे अगदी आवडीने खातो, सुषमा स्वराज यांची मुलगी बासुरी हिला थालीपीठ आवडते अशा अनेकांच्या आवडी-निवडी गडकरींनी उपस्थितांना सांगितल्या.