गेल्या अनेक वर्षांपासून जमीन घेऊन उद्योग न उभारणाऱ्या कंपन्यांना तीन महिन्यांत काम सुरू करण्याची नोटीस राज्य सरकारने बजावली असली तरी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना मात्र हे मान्य नसून उद्योजकांना किमान तीन वर्षांची मुदतवाढ देण्याची सूचना त्यांनी केली आहे. यामुळे मिहानमध्ये लवकरात लवकर उद्योगधंदे सुरू होऊन रोजगार निर्मिती करण्याचे स्वप्न आणखी पुढे सरकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहानकडे प्राधान्याने लक्ष घालून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्याचाच भाग म्हणून ज्या उद्योजकांनी मिहानमध्ये भूखंड घेऊन ठेवले, पण उद्योगच सुरू केले नाही त्यांना तीन महिन्यांत उद्योग सुरू करण्याची नोटीस बजावण्यात आली. यात सुमारे ३५ कंपन्यांचा समावेश आहे. आता ही मुदत संपण्यास काही दिवसच राहिलेले असताना मिहान कृती दलाचे नेतृत्व करीत असलेले गडकरी यांनी तीन वर्षांची मुदत देण्याची सूचना केली आहे. गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मिहान कृती दलाची गुरुवारी रविभवनात बैठक झाली. यात त्यांनी उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी मुदतवाढ देण्याची सूचना केली.