19 September 2020

News Flash

आयारामांच्या उमेदवारीवर गडकरींची नापसंती

क्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या सभेकडे या मतदारसंघाशी संबंधित तीन माजी खासदारांनी पाठ फिरवली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (संग्रहित छायाचित्र)

किनवट नगर परिषद निवडणूक; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या सभेकडे माजी खासदारांची पाठ

किनवट नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातील बेबनाव समोर आला असून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या सभेकडे या मतदारसंघाशी संबंधित तीन माजी खासदारांनी पाठ फिरवली. नगराध्यक्षपदासाठी पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांस डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांला उमेदवारी देण्याच्या प्रकारावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नापसंती व्यक्त केली आहे.

किनवट न. प. च्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांच्या १८ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची जाहीर सभा शनिवारी सकाळी १० वाजता होणार, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु दानवे दुपारी १.३० नंतर किनवटमध्ये दाखल झाले. त्यांची वाट पाहून अनेकजण सभास्थानावरून परत गेले.

पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांच्यासह माजी खासदार सुभाष वानखेडे आणि अ‍ॅड. शिवाजी माने यांची अनुपस्थिती चच्रेचा विषय ठरली. या निवडणुकीत भाजपची सारी सूत्रे बाहेरून किनवटमध्ये आलेल्या अशोक सूर्यवंशी यांच्या हाती असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर हेच निवडणुकीचे प्रभारी झाले आहेत.

भाजपचे जुने, सक्रिय कार्यकत्रे सुधाकर भोयर यांच्या पत्नी ज्योती भोयर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी द्यावी, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सूचविले होते. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही त्यांनी आपली शिफारस कळविली होती; परंतु सूर्यवंशी व रातोळीकर यांनी प्रदेशाध्यक्षांकडे आनंद मच्छेवार यांचे नाव निश्चित करून घेतले. या प्रकारामुळे निष्ठावानांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. त्यातच भोयर यांना डावलण्यात आल्याचा प्रकार गडकरी यांना शनिवारी मुंबईत समजल्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे बोट दाखविल्यानंतर गडकरी यांनी पक्षातील मनमानी कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली. सुधाकर भोयर यांनी गडकरी यांची भेट घेऊन सर्व वृत्तांत त्यांना सांगितल्याचे समजते.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी गेल्या आठवडय़ात जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधून नगरपालिका निवडणुकीबाबत माहिती घेतली होती; परंतु निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेणाऱ्या सूर्यवंशी यांनी पाटील यांना पक्षाच्या प्रचारासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित केलेच नाही. या पाश्र्वभूमीवर दानवे यांच्या सभेकडे श्रीमती पाटील यांच्यासह वानखेडे व माने या दोन माजी खासदारांनीही पाठ फिरवली. संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी, माजी खासदार डी. बी. पाटील हे सभेला उपस्थित होते. दानवे सभास्थानी साडेतीन तास उशिराने दाखल झाले आणि अवघ्या ५-७ मिनिटांत भाषण करून यवतमाळ जिल्ह्यास रवाना झाले. किनवट शहरातील विकासकामांसाठी भाजपच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन करून या शहरात मूलभूत सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन खासदार दानवे यांनी आपल्या भाषणात दिले.

दानवेंवर मुंडेंची टीका

किनवटमध्ये शनिवारी दुपारी भाजप प्रदेशाध्यक्षांची सभा झाल्यानंतर सायंकाळी त्याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी दानवे यांच्यासह फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. दानवे ज्या भोकरदनमध्ये राहतात तेथील जनतेने त्यांच्या घोषणेवर अविश्वास दाखविला होता. आता ते किनवटच्या जनतेची फसवणूक करायला येथे आले होते, असा टोला आमदार मुंडे यांनी लगावला. पारदर्शक कारभाराची भाषा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील ११ मंत्री घोटाळेबाज असून त्यांनी कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप आमदार मुंडे यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 1:48 am

Web Title: nitin gadkari dislike candidate selection for kinwat municipal council poll
Next Stories
1 देशमुख यांच्या निवडीमुळे मसापचा प्रभाव पुन्हा सिद्ध!
2 गोपीनाथ गडावरचा गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द
3 पात्र असूनही अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीची संधी-मुख्यमंत्री
Just Now!
X