News Flash

आघाडी सरकार बैलासारखे, टोचल्याशिवाय पुढेच जात नाही!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची टीका

आघाडी सरकार बैलासारखे, टोचल्याशिवाय पुढेच जात नाही!

राज्यातील महाविकास आघाडी सरकार बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात केली.

नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी गडकरी म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात आली. मात्र सरकार बदलले आणि काम ठप्प झाले. नागपूर ब्रॉड गेज मेट्रोला मंजुरी देण्यासाठी एक वर्ष या सरकारला लागले. भाजपचे सरकार असते तर एक महिन्यात झाले असते. निवडणुकीत जातीपातीचे राजकारण केले जात आहे. माणूस हा जातीने मोठा होत नसतो तर कर्तृत्वाने मोठा असतो. निवडणूक आली की अमक्या जातीचा आहे म्हणून उमेदवारी मागितली जाते. विविध पक्षांमध्ये ज्या जातीनिहाय आघाडी करण्यात आल्या आहेत त्या बंद झाल्या पाहिजे. कार्यकर्त्यांत जात नसते. मात्र ज्याला उमेदवारी पाहिजे असते त्यांना जात आठवते. परंतु राज्यातील आघाडी सरकार व केंद्रातील विरोधक जातीचे राजकारण करीत आहेत. त्यांना धडा शिकवायला हवा, असेही गडकरी म्हणाले.

हे सरकार आहे की तमाशा?

विश्वासघात करत राज्यात तीन पक्षांचे सरकार आले. पण आज सरकारमधील एकही मंत्री वर्षांतील आपले काम सांगू शकले नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतकऱ्यांना दिलेले वचन लक्षात नाही. मात्र मुख्यमंत्रिपदाचे वचन त्यांच्या बरोबर लक्षात आहे. हे सरकार आहे की तमाशा? ओबीसी मुलांना जगात चांगल्या ठिकाणी शिकता यावे यासाठी योजना आणली, मात्र हे सरकार काय करतेय माहीत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले. मात्र या सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करतात, असेही फडणवीस म्हणाले. या वेळी सुधीर मुनगंटीवार व चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भाषणे झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 2:10 am

Web Title: nitin gadkari maharashtra government mppg 94
Next Stories
1 अण्णा हजारे यांचा शेतकरी आंदोलनास पाठिंबा
2 राज्यात गेल्या चोवीस तासांत साडेपाच हजार नव्या करोनाबाधितांची नोंद, ८५ जणांचा मृत्यू
3 सर्वच स्तरांवर अपयशी ठरलेले महाविकास आघाडी सरकार कुचकामी : केशव उपाध्ये
Just Now!
X