सरकार कोणाचीही असो सरकारी नोकऱ्यांची संख्या अत्यल्प राहणार आहे. तेव्हा उद्यमशील  बना आणि नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी  यांनी रविवारी केले. मराठा समाजाने मराठा जागर एक दिवसीय अधिवेशन येथील जैन कलार समाज भवनात आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या स्पष्ट विधानाद्वारे  मराठा आरक्षणामुळे फार काही पदरी पडणार नाही, याची अप्रत्यक्ष जाणीव गडकरी यांनी मराठा समाजाला करून दिली. भाषणाच्या प्रारंभीच गडकरी  म्हणाले की, स्पष्ट बोलणे राजकारणासाठी अडचणीचे ठरते. मात्र, आपण स्पष्ट बोलतच राहणार.

याप्रसंगी मुधोजी राजे भोसले, आमदार नरेंद्र पाटील, अखिल भारतीय मराठा महासंघाचे शशिकांत पवार, सकल मराठ क्रांती मोर्चाचे नरेंद्र मोहिते, प्रतापराव बारस्कर, अरुण पवार, शिरीष शिर्के, कविता भोसले उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, मराठा समाजातील मूळ समस्या काय हेच नीट समजले नाही. जोपर्यंत समस्या समजत नाही, तोपर्यंत त्यावर योग्य उपाययोजना करता येत नाही. आपला देश श्रीमंत आहे, परंतु जनता गरीब आहे. काय केल्याने श्रीमंत देशातील गरिबी दूर होईल, याचे कारण आपण समजून घेतलेले नाही. उद्योगशीलता वाढली पाहिजे. शेतीचे उत्पन्न वाढले पाहिजे, तरच रोजगार निर्मिती होईल.

नोकरी म्हणजे सरकारी नोकरी आणि रोजगार म्हणजे खासगी क्षेत्रात निर्माण रोजगार. सरकारी नोकऱ्यांची संख्या कमी होत आहेत. त्यामुळे मराठा समाजाने  उद्यमशील बनावे. त्यासाठी समाजातील युवकांना प्रोत्साहित केले पाहिजे. नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना. मराठा आरक्षणामुळे नोकऱ्या मिळतील, असे समजणे चुकीचे आहे.