घरगुती अथवा सार्वजनिक कार्यक्रमात शीतपेयाऐवजी  सुगंधित दूध द्या. यामुळे विदर्भातील दूध उत्पादकांना एक मोठा आर्थिक आधार लाभेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शनिवारी नागपुरातील हनुमाननगर येथील महानगरपालिकेच्या लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेत नॅशनल डेअरी डेव्हल्पमेंट बोर्डतर्फे विद्यार्थ्यांसाठी सुगंधित दूध योजनेच्या शुभारंभ झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, एनडीडीबीचे अध्यक्ष दिलीप रथ, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर,मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी आदी उपस्थित होते.

गडकरी यावेळी म्हणाले, सशक्त व चतन्यपूर्ण भारताचा पाया लहान मुले आहेत. त्यांच्या वाढत्या वयात पोषणाच्या गरजा पूर्ण करणे महत्वाचे असते. दूध हे पूर्णान्न असल्यामुळे मुलांना त्याद्वारे सुदृढ बनवता येऊ शकते. मुले नियमित दूध प्यायली तर त्यांच्या आरोग्य व आकलनविषयक क्षमतांमध्ये सुधारणा होते. म्हणूनच शीतपेयाऐवजी दुधाला प्राधान्य द्यावे.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये गिफ्टमिल्क सुरू करू, अशी घोषणा केली. नागपूर जिल्ह्यत २१ शाळांमध्ये ही योजना लागू केली असून  त्याचा सहा  हजार विद्यार्थ्यांना  लाभ मिळणार आहे. नॅशनल डेअरी डेव्हल्पमेंट बोर्डला मदर डेअरी फ्रुट एण्ड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेडने त्यांच्या सीएसआर मदतीअंतर्गत पाठबळ दिले आहे.