“मी आज राजकारणात आहे. पण माझ्या बायको-मुलांनी कधीही मी राजकारणात आहे म्हणून माझ्या नावाचा उपयोग केला नाही. आई-वडिल राजकारणात असेल की, ते मुलांसाठी तिकिट मागतात. पण मला त्या प्रकाराचा तिटकारा आहे” अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी राजकारणातल्या घराणेशाहीवर आपलं मत व्यक्त केलं. ते लोकसत्ताच्या सहज बोलता, बोलता वेब संवादामध्ये  बोलत होते.

“राजकारण सोडून माझ्या सर्व गोष्टींवर तुमचा अधिकार आहे हे मी माझ्या कुटुबीयांना सांगितलं आहे. माझा राजकीय वारस हा माझा कार्यकर्ता आहे. कारण त्यांच्यामुळे आज मी मोठा झालो” असे नितीन गडकरी म्हणाले. निवडणुकीच्या काळात कुटुंबीय प्रचारासाठी जातात. तेवढाच त्यांचा राजकारणाशी संबंध आहे असे गडकरी म्हणाले.

लहानपणी जिथे रहायचो तो भाग संघाला अनुकूल नव्हता

“लहानपणी नागपूरमध्ये मी जिथे रहायचो. तो भाग संघाला अनुकूल नव्हता. विरोध करणारा मोठा वर्ग होता. आम्ही संघात जायचो त्यावेळी लोक हेटाळणी करायचे, उपहास, अपमान करायचे. एकदिवस हे चित्र बदलून दाखवीन असा विश्वास होता आणि आज ते चित्र बदललं” असे गडकरी म्हणाले.

“त्या भागातलं राजकीय स्थित्यंतर मी बघितलं. त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेली मंडळी सगळी भाजपामध्ये आली. निवडणुकीच्या काळात आम्ही जोरदार प्रचार करायचो. आमचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास असायचा पण निकाल यायचा त्यावेळी आमच्या उमेदवाराचा पराभव झालेला असायचा. पण आता त्या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार ५० ते ६० हजार मताने निवडून येतो” असे गडकरी म्हणाले.