नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा एक वेगळा अंदाज आज नागपूरकरांना पहायला मिळाला. करोना लॉकडाउन काळात बाजारपेठेत नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर मुंढे यांनी रस्त्यावर उतरून कारवाई केली. यानंतर पीपीई किट घालून मुंढे यांनी नागपूरमधील कोविड रुग्णालयात भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला आणि आरोग्य व्यवस्थेचाही आढावा घेतला.

वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक बसावा हे आयुक्त म्हणून आपलंही कर्तव्य आहे. शहरातील एकाही व्यक्तीचा जीव करोनामुळे जाऊ नये हा माझा प्रयत्न आहे. याचसोबत मिशन बिगीन अगेन अंतर्गत मिळालेल्या सवलतींकडे संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे. कोणतेही नियम मोडले जाणार नाही याची काळजी घेणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचं मुंढे यांनी सांगितलं आहे.

त्याशिवाय नागपूर कोरोनामुक्त व्हावं यासाठी तुकाराम मुंढे यांनी मास्टर प्लॅन तयार केला होता. नागपूरमधील सतरंजीपुरा भाग करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त मुंढे यांनी सतरंजीपुरामधील जवळपास १७०० लोकांना क्वारंटाईन केलं आहे. तसेच या परिसरात सीआरपीएफ आणि जीआरपीचे २०० जवान तैनात केले आहेत. याव्यतिरीक्त गरोदर मातांची तपासणी, टीबी पेशंट शोधून त्यांची वेगळी तपासणी असे अनेक उपक्रम मुंढे यांनी शहरात गेल्या काही दिवसांपासून राबवले आहेत.