नगर : निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी केलेल्या वक्तव्याचा ठोस पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे योग्य नाही, ज्या माध्यमांनी महाराजांनी केलेल्या वक्तव्याची बातमी छापली होती, त्यांना नोटीस देण्यात आली असून, त्यांनी पुरावा दिल्यास त्या पुराव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, इतर कोणाची तक्रार असल्यास त्याबाबत पुरावे द्यावेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.

संतती प्राप्तीसंदर्भात कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण झालेला आहे. युटय़ुबवर त्यांच्या कीर्तनाचा व्हिडीओ प्रसारित करण्यात आला, त्यात त्यांनी महिलांची मानहानी केल्याची तसेच मूल जन्माबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याची तक्रार आहे. यासंदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती व भूमता बिग्रेडने महाराजांवर पीसीपीएनडीटी व भारतीय दंड विधान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे महाराजांच्या समर्थनासाठी त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आहेत. महाराजांनी केलेल्या कीर्तनातील वक्तव्यावर मुंबईतील माध्यमात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यांच्याकडे आम्ही पुरावे सादर करण्यास सांगितल्याचे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले. तक्रारीनंतर इंदोरीकर महाराजांना त्यांनी केलेल्या वक्तव्याचा खुलासा ७ दिवसांत सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटिशीला महाराजांनी काल, बुधवारी उत्तर दिले. हे उत्तर त्यांनी वकिलांमार्फत जिल्हा शल्य चिकित्सकांकडे धाडले. मी असे कोणतेही वक्तव्य केले नसून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी नगर जिल्ह्यांमध्ये एकही कीर्तन केले नसल्याचा तसेच समाजमाध्यमात प्रसारित होत असलेल्या व्हिडिओतही छेडछाड झाली आहे, असा खुलासा इंदोरीकर महाराजांनी केल्याचे समजले. आरोग्य विभागाने युटय़ुबवरील व्हिडीओही पोलिसांकडे तपासणीसाठी दिला होता, त्या व्हिडीओच्या लिंकही आता डिलिट करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी महाराजांनी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी दिलगिरीही व्यक्त केली होती.

दरम्यान, इंदोरीकर महाराजांची वक्तव्य ज्या माध्यमांनी बातमी स्वरुपात दिली होती, त्यांना आम्ही नोटिस बजावल्या आहेत. जर त्या माध्यमांनी आम्हांला त्या वक्तव्याचा पुरावा दिला तर आम्ही त्या पुराव्यांची शहानिशा करून योग्य ती कारवाई करू, परंतु इंदोरीकर महाराजांनी दिलेल्या खुलाशानुसार आणि कोणत्याही पुराव्याअभावी महाराजांवर सध्यातरी कारवाई करू शकत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले.