पावसाळा सुरू झाला, की उन्हाने गवताची वैराण झालेल्या कासच्या पठारावर जीवसृष्टी बहरायला सुरुवात होते. जूनच्या पहिल्या पावसापासून पठार हिरवेगार होते. ऑगस्टच्या अखेरीस सर्व प्रकारची फुले थोडय़ा प्रमाणात यायला सुरुवात होते. कास पठारावर दुर्मिळ फुलांचा बहर सुरू झालेला असतानाच दुसरीकडे पर्यटकांना मात्र येथे प्रवेशबंदी आहे. सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर घाटात सांबरवाडी जवळ ठिय्या मांडल्याने कासला येणा-यांना पोलीस परत पाठवत असल्याने सातारकरांसह परिसरातील व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

करोना संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून घरातच बसलेल्या पर्यटकांना कास पठार ,महाबळेश्वर पाचगणी ही पर्यटन स्थळं जवळची आहेत. त्यामुळे पर्यटक या स्थळांना पसंती देत असतात. सध्या शनिवार, रविवार आठवडी संचारबंदी असल्याने या दिवशी या परिसराकडे कोणी फिरकत नाही. मात्र सोमवार ते शुक्रवार या कालावधीत निर्बंध शिथील असल्याने पर्यटक तुरळक प्रमाणात हजेरी लावतात. जिल्ह्यातील पर्यटकांना सांबरवाडी येथे आडवून त्यांची चौकशी करून परत पाठवले जात आहे. त्यामुळे कास मार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मागील दीड वर्षापासून पर्यटक नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. एकूणच परिसरात लोकांचे आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा स्थितीमध्ये इतर दिवशीही त्यांना अडविणे अन्याय असल्यासारखे आहे, असं  मत कास परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे. या निर्बंधाचा फटका मात्र या रस्त्यावर अवलंबून असलेल्या कास, बामणोली भागातील शेकडो स्थानिक लोकांना बसत आहे. तसेच कामानिमित्त सातारा शहरात येणा-या  लोकांना विनाकारण चौकशीला सामाेरे जावे लागत आहे.

Covid 19: “….पुढील वर्षही सुरक्षित वाटत नाही”

गेल्या वर्षभरात करोनामुळे कास परिसरातील हाॅटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यात कास परिसरात यायला स्थानिकांनाही अटकाव होत आहे. त्यामुळे कामगार व या व्यवसायावर अवलंबून असलेले सर्वच घटक आर्थिक अडचणीत आहेत. प्रशासनाने यावर तोडगा काढून पर्यटन चालू करून दिलासा द्यावा अशी मागणी व्यवसायिकांच्या वतीने संपत जाधव यांनी केली आहे.