वारंवार सूचना करूनही करोनाच्या पाश्र्वभूमीवर आरोग्य  तपासणीसाठी कोकण रेल्वेच्या नियोजित वेळेपूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांना गाडीमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोकण रेल्वेतर्फे सर्व स्थानकांवर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी केली जात आहे. हे काम सुरळीतपणे पूर्ण होण्यासाठी संबंधित गाडीच्या निर्धारित वेळेपूर्वी किमान एक तास आधी प्रवाशांनी स्थानकात उपस्थित राहावे, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. या आवाहनाला बहुसंख्य प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.  मात्र काही प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.

करोनाचा  प्रसार रोखण्यासाठी कोकण रेल्वे आवश्यक खबरदारी घेत आहे. रेल्वेचे सर्व कर्मचारी—अधिकारी त्यासाठी मेहनत घेत आहेत.त्यांच्या या प्रयत्नांना प्रवाशांचीही साथ अपेक्षित आहे. त्यामुळे कोकण रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांनी निर्धारित वेळेपूर्वी किमान पाऊण तास आधी रेल्वे स्थानकात पोहोचणे अनिवार्य आहे. तसे न करणाऱ्या प्रवाशांबाबत कठोर धोरण अवलंबले जाणार असून ऐनवेळी येणाऱ्या प्रवाशांना गाडीमध्ये प्रवेश न मिळण्याची भिती आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५०५ करोनाग्रस्त

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी २६ व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल बाधीत आले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ५०५ रुग्ण सक्रिय उपचार घेत आहेत.  मंगळवारपर्यंत एकूण ४ हजार १५४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. मंगळवारपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ हजार ७८५, मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या १२६ एवढी झाली आहे. तसेच मंगळवारी १९ रुग्ण करोना मुक्त झाले