बाळगंगा धरण भ्रष्टाचार प्रकरण :
बाळगंगा धरण भ्रष्टाचार प्रकरणात अटक असलेल्या पाच जणांचा जामीन अर्ज ठाणे येथील विशेष न्यायालयाने फेटाळला. जामीन अर्ज फेटाळलेल्यांमध्ये एफ ए कन्स्ट्रक्शनच्या निसार खत्री, जिहाद खत्री, अबिद खत्री या तिघांचा तर राजेश रिठे आणि विजय कसाट या दोन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत एफ ए कन्स्ट्रक्शनचे पाच भागीदार आणि जलसंपदा विभागातील सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून इतर सहा जणांसह माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि अजित पवार यांची चौकशी सध्या सुरू आहे.
रायगड जिल्ह्य़ातील पेण तालुक्यातील बाळगंगा नदीवर हे धरण बांधण्यात येणार होते. कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने सदर कामासाठी निविदा मागवल्या होत्या. मात्र निविदा मागवताना बोगस कागदपत्रांचा वापर करण्यात आला होता, तर एफ ए कन्स्ट्रक्शन या कंपनीलाच ठेका मिळावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले होते. सुरुवातीला या धरणाची किंमत ३५३ कोटी एवढी होती, मात्र वर्षभराच्या ही किंमत १ हजार २२० कोटींवर नेण्यात आली होते.
या प्रकरणाची चौकशी सध्या लाचलुचपत विभागामार्फत सुरू असून रायगडचे पोलीस उपअधीक्षक सुनील कलगुटकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, बाळगंगा धरण प्रकरणात गेल्या दीड वर्षांपासून अटक असलेल्या पाच जणांनी ठाण्याच्या विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायालयाने पाचही आरोपींचे जामीन अर्ज फेटाळत असल्याचे जाहीर केले.