संदीप आचार्य 

राज्यात करोनाचे रुग्ण रोजच्या रोज वाढत चालले असून या रुग्णांना एकीकडे बेड मिळणे अवघड होत चालले आहे तर दुसरीकडे आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांसह तब्बल २९ हजाराहून पदे आजही रिकामी आहेत. यातील गंभीर बाब म्हणजे करोना काळासाठी ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ अंतर्गत १९,७५२ पदे तात्काळ भरण्याचा निर्णय झाला मात्र करोनाला पाच महिने उलटल्यानंतरही यातील १२,५७४ पदे भरलेली नाहीत. याचा मोठा फटका रुग्ण सेवेला बसतो आहे.

महाराष्ट्रात आजघडीला १० लाख ६० हजाराहून अधिक करोना रुग्णसंख्या झाली आहे तर २९,५३१ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात आता करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून करोनाचा प्रसार रोखणे व उपचार या दोन्ही गोष्टी आता हाताबाहेर जाऊ लागल्याचे आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेले काही दिवस राज्यात रोज २२ ते २४ हजार करोना रुग्ण आढळत असून दोन लाख ८० हजाराहून अधिक रुग्ण अॅक्टिव्ह म्हणजे उपचाराधीन आहेत. यातील मोठ्या संख्येने रुग्णांना आज बेड मिळणे कठीण झाले असून अतिदक्षता विभागात बेड मिळणे हे आमच्यासाठीही एक आव्हान बनल्याचे विविध पक्षाच्या आमदारांचे म्हणणे आहे.

पुणे शहर व जिल्हा तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व नाशिकमध्ये वेगाने वाढणाऱ्या रुग्णांसाठी बेडची व्यवस्था कशी करायची हा एक प्रश्नच बनला आहे. ठाणे जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून ठाण्यात आजघडीला २९,५३१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत ३०३१६ रुग्ण, पुणे ७७,६२४ रुग्ण अॅक्टिव्ह असून पुण्यातील सर्व रुग्णालयात मिळून ५५७३ करोना बेड आहेत तर २८७८ बेड अतिदक्षता विभागात आहेत. यामुळे पुण्यात करोना रुग्णांना बेड मिळविण्यासाठी प्रचंड त्रास होत असल्याचे तेथील डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय सातारा येथे ८८९० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर कोल्हापूर ९४८६,सांगली १०३६१,नाशिक १२,८६० आणि सोलापूर येथे ७११६ अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.

एकीकडे करोना रुग्ण आणि रुग्णालयातील बेडची संख्या याचे प्रमाण व्यस्त बनत असतानाच डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ व अन्य आरोग्य कर्मचार्यांची हजारो पदे भरलीच जात नाहीत. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरसह रुग्णोपचारासाठी विशेष प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांची आवश्यकता असून त्याबाबत बोंब असल्याचे आरोग्य विभागाच्याच ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. आरोग्य विभागात आजमितीला तब्बल २९ हजाराहून जास्त पदे रिक्त असून ही पदे भरणार कधी असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या अखत्यारीत ५६,५६० नियमित मंजूर पदे आहेत त्यापैकी १७,३३७ पदे गेल्या अनेक वर्षात भरण्यात आलेली नाहीत. यात सहसंचालक, अतिरिक्त संचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, सिव्हिल सर्जन, वर्ग ‘अ’ व ‘ब’ चे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ अशी हजारो पदे आहेत. याशिवाय करोना काळात विशेष बाब म्हणून आरोग्य विभागाअंतर्गत ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ ( एनएचएम) खाली १९,७५२ पदे तातडीने मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी १२,५७४ पदे करोनाला पाच महिने उलटूनही भरण्यात आलेली नाहीत. यात पुणे जिल्ह्यातील पुणे, सोलापूर व सातारासाठी २४७९ मंजूर पदे आहेत पैकी ९११ रिक्त आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी १७९३ मंजूर पदे असून ९२३ पदे भरलेली नाहीत. ठाणे जिल्ह्यासाठी १८८९ पदे मंजूर असून १४९४ पदे भरली नाहीत. औरंगाबाद २४३६ पदांपैकी १४६१ रिक्त पदे तर नाशिक जिल्ह्यासाठी २३३० मंजूर पदे असताना ११६५ पदे आजही रिकामी आहेत.

याबाबत आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की अनेक ठिकाणी डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ मिळत नाही हे खरे असले तरी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी त्यासाठी योग्य प्रकारे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा गेले पाच महिने करोनाच्या उपचारात दिवसरात्र राबत आहे. अशावेळी पालकमंत्र्यांनी संबंधितांकडे पाठपुरावा करून ही रिकामी पदे भरणे आवश्यक आहे.

आरोग्य विभागाची ही पदे रिकामी राहिल्यामुळे रुग्णांच्या संपर्कातील लोकांना शोधणे ही अवघड होऊन बसले आहे. सरकार सांगते एका रुग्णामागे किमान संपर्कातील २० लोकांना शोधून काढा. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग सरकार देणार नसेल तर करोना नियंत्रणात आणणार कसा असा सवाल करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३१ जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण संपर्कातील लोकांचा शोध संख्या ही १० पेक्षा कमी आहे. एकीकडे रुग्ण रोजच्या रोज वाढत आहेत तर दुसरीकडे अपुर्या आरोग्य यंत्रणेमुळे रुग्ण संपर्कातील लोकांना शोधणे अवघड झाले आहे. यातूनच रुग्ण वाढत आहेत आणि रुग्णालयात बेड मिळणे अवघड होऊन बसले आहे.