27 February 2021

News Flash

दिलासादायक : महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही; सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू राहणार

पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची माहिती

संग्रहीत

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी निगेटिव्ह आढळून आले आहेत. राज्यात बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून, पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच, सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना सुनिल केदार म्हणाले, पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे येथे पाच राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शीर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. सन २०२०-२१ मध्ये या संस्थेने आजतागायत राज्यातील एकूण १ हजार ७१५ विष्ठा नमूने, १हजार ९१३ रक्तजल नमूने १ हजार ५४९ घशातील द्रवांच्या नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमूने बर्ड फ्लू रोगासाठी निगेटिव्ह आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कोबडयांमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग नाही –
तसेच, स्थलांतरीत होणा-या जंगलीपक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन करणा-या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे निर्गमीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोबडयांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही. अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुट पालक, अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही. स्थलांतरीत होणा-या जंगली पक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन देखील केदार यांनी केले.

हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळमध्ये प्रादुर्भाव –
बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ राज्यामधील स्थलांतरीत पक्षामध्ये आढळून आला आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा जिल्ह्यातील पांग धरणाच्या परिसरात सायबेरीया आणि मंगोलीया या देशामधून स्थलांतरीत झालेल्या डोक्यावर दोन पट्या असणाऱ्या बदकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहेत. निशाद (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस, भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने मृत्यूसाठी बर्ड फ्लू रोगाचा H5N1 स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे, हिमाचल प्रदेश राज्यातील वन विभागांद्वारे पानथळ जमीनीशेजारच्या भागामध्ये या रोगाच्या सर्व्हेक्षणाचा मोठया प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 8:08 pm

Web Title: no bird flu in maharashtra sunil kedar msr 87
Next Stories
1 साताऱ्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; पिकांचे, फळबागांचे नुकसान
2 मंत्री विजय वडेट्टीवारांचा पासपोर्ट जप्त; गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप
3 रायगड, बदलापूर, कर्जत-खालापूरसह खोपोलीत पावसाची जोरदार हजेरी
Just Now!
X