News Flash

भाजप आमदार फुटीची केवळ वल्गनाच – दरेकर

या जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सूत्र अजिबात विचारात घेतले जाणार नाही.

कराड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रगल्भ नेतृत्व लाभलेला देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप हा आहे, असे असताना अळवावरच्या पाण्यासारखे ज्यांचे राजकारण आहे त्यांच्या पाठीमागे कोण जाणार, असा सवाल करत भाजपचे कोणीही आमदार कोठेही जाणार नाही. या केवळ राजकीय वल्गना असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठामपणे सांगितले.

साताऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे तब्बल चाळीस आमदार आमच्या संपर्कात असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा दरेकर यांनी फेटाळून लावला. पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपची किमान एक जागा आली, पण राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे आहेत, त्यांची या निवडणुकीत एकही जागा नाही. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांचा जोर आहे. तेथे जिल्ह्यात नगण्य ताकद असणाऱ्या शिवसेनेचा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निभाव लागणे कठीण आहे. या जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सूत्र अजिबात विचारात घेतले जाणार नाही. तर, एकंदरच राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या त्रांगडय़ात शिवसेनेची फरपटच सुरू असल्याची टीका दरेकर यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी असून, त्याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा घोळ तातडीने मिटवण्याच्या सूचना केल्या असल्याचे दरेकर यांनी सांगितले. करोनाच्या लसीसंदर्भात काही आक्षेप असल्याच्या मुद्दय़ावर ते म्हणाले, करोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यावरील उपाययोजना व उपलब्ध होणारी लस ही सर्वासाठी असून, त्यामध्ये कोणताही आक्षेप घेण्याचे कारण नाही.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांनी चिंचणेर निंब (सातारा) येथील सैन्यदलातील शहीद जवान सुजित किर्दत यांचे वडील निवृत्त ऑनररी कॅप्टन नवनाथ किर्दत व भाऊ नायक सुभेदार अजित किर्दत यांच्यासह कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 12:33 am

Web Title: no bjp mla will go anywhere says pravin darekar zws 70
Next Stories
1 बार्शीजवळ सराफी पेढी फोडून १४ किलो चांदी लांबविली
2 जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पुन्हा उत्साहाची लाट
3 दस्तावेजांच्या नोंदणीत अडथळा
Just Now!
X