Advertisement

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा होणार नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय

बारावीच्या निकालांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होतील, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळानं बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

“कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर ३१ तारखेआधी आमच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत. पण एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठानं घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत”, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.

प्रोफेशनल कोर्सेससाठी २६ ऑगस्टपासून CET

दरम्यान, प्रोफेशनल कोर्ससाठी २६ ऑगस्टपासून सीईटीची प्रक्रिया सुरु होईल, असं देखील उदय सामंत यांनी सांगितलं. मागील वर्षी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी नव्हती, त्या अभ्यासक्रमांना यावेळेस देखील सीईटी नसेल. इंजिनियरिंग साठी सीईटी दोन सत्रात असेल. पहिले सत्र १४ सप्टेंबरपासून, तर दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून पुढे असेल.

कोणत्या अभ्यासक्रमांसाठी CET होतील?

१. एम बी ए
२. एम सी एम
३. आर्किटेक्चर
४. बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
५. मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट
६. बी एड.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी, अकरावीमध्ये मिळालेले सरासरी गुण आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला. निकालाची टक्केवारी जवळपास साडेआठ टक्क्य़ांनी वाढली असून, १३ लाख १४ हजार ९६५ नियमित विद्यार्थी उच्चशिक्षण संस्थांच्या उंबऱ्यावर प्रवेशासाठी दाखल झाले आहेत. यंदा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रमाणही वाढले असून, ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर साधारण २६ हजार ३०० खासगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.

Maharashtra HSC Results – कोकण विभागानं मारली बाजी, औरंगाबादचा निकाल सर्वात कमी!

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संख्या (९१ हजार ४२०)अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ८४ हजारांनी ही संख्या वाढली आहे. त्यामुळे पदवी प्रवेशांच्या अटीतटीला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, नामवंत संस्थांमध्ये पारंपरिक किंवा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवणे कठीण होणार आहे.

HSC Result 2021 : तुमच्या निकालाबाबत तक्रार असेल तर कशी आणि कुठे नोंदवाल? वाचा सविस्तर!

प्रवेशाची स्थिती

राज्यातील साधारण साडेचौदा लाख विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. त्यात इतर मंडळांतील प्रवेशपात्र विद्यार्थी, परराज्यांतून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही भार पडेल. यापैकी वैद्यकीय, वैद्यकीय पूरक, परिचर्या, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बारावीनंतरचा विधि अभ्याससक्रम, शिक्षणशास्त्र, व्यवस्थापन पदवी, हॉटेल व्यवस्थापन पदवी, कृषी यांसह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जागा या साधारण साडेचार ते पाच लाखांच्या घरात असल्याचे दिसते. त्यानुसार जवळपास १० लाख विद्यार्थी पारंपरिक विद्याशाखांसाठी प्रवेश घेण्याच्या स्पर्धेत असणार आहेत. ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्येही जवळपास ५ ते १० टक्क्य़ांची वाढ होऊ शकेल, असे मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

24
READ IN APP
X
X