जयंत पाटील यांचा निर्वाळा

जळगाव : विधान परिषद सदस्यत्वासाठी राज्यपालांकडे महाविकास आघाडीने राज्यपालांकडे दिलेल्या १२ नावांमध्ये कोणाचेही नाव वगळण्यात आलेले नसल्याचा निर्वाळा राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.

शनिवारी चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी के ल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांनी सुचविलेल्या १२ जणांच्या यादीला अनेक दिवसांनंतरही मंजुरी दिली जात नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडविले जात असल्याचे आता जनतेला वाटू लागले आहे. या यादीतून कोणाचेही नाव वगळण्यात आलेले नाही. सत्ताधारी तीनही पक्षांच्या सहमतीने राज्यपालांना नावे पाठविण्यात आलेली असून राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा, असेही पाटील यांनी सांगितले.

ईडी या देशात विरोधी पक्षावर  सतत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असते. कुणाची कोणतीही चूक नसताना ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधी पक्षांना नामोहरण करण्यासाठी केला जात आहे. कोणतीही चूक नसताना कारवाई करणे, बदनामी करणे किंवा प्रभावित करणे असे उद्योग सुरू आहेत. एकनाथ खडसे यांच्या पाठीशी पक्ष  खंबीरपणे उभा राहील, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.