वाई

लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांवरील अविश्वास ठराव बहुमताने फेटाळण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष झालेले सचिन शेळके-पाटील यांच्यावर आणलेला अविश्वास ठराव आज १२ विरूध्द एक मताने फेटाळण्यात आला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने विरोधात मतदान केल्याने भाजपचे सचिन शेळके यांचे नगराध्यक्षपद कायम राहिले. आमदार मकरंद पाटील यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

लोणंद नगरपंचायतीत सुरूवातीपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. सुरुवातीला नगराध्यक्ष निवडीवेळी निर्माण झालेल्या राजकीय परस्थितीत सचिन शेळके-पाटील यांच्याच नावाची जोरदार चर्चा होती. मात्र त्यावेळी त्यांची संधी हुकली. वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या स्नेहलता शेळके- पाटील या नगराध्यक्ष झाल्या होत्या. भाजपला उपाध्यक्षपदाची संधी दिली गेली. त्यानंतर सचिन शेळके-पाटील हे नगराध्यक्ष झाले. नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील यांच्याविरुध्द एकूण १७ पैकी १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या ठरावावर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी आज दुपारी लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले-राजापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भाजपचे १३ सदस्य उपस्थित होते. तर भाजपचे नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील व चार नगरसेवक बैठकीला अनुपस्थित राहिले.

यावेळी अविश्वास ठरावावर चर्चा करून हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान १२ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केल्याने हा ठराव फेटाळण्यात आला. लोणंद शहरात प्राबल्य असूनही एका नगरसेवकाने पक्षादेश झुगारून मतदान केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.