येथील जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्यावर काही सदस्यांनी अविश्वास आणला असून २४ सप्टेंबरलाच जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेला आहे.
ऑगस्टमध्ये विरोधकांकडून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू होत्या, परंतु त्यांचे मनसुबे हाणून पाडत जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट व समाजकल्याण सभापती विश्वनाथ भोवते यांनी अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी लागणाऱ्या १८ सदस्यांची जुळवाजुळव करून ५ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. तो १९ सप्टेंबरच्या विशेष सभेत बारगळला. त्यानंतर काही सदस्यांनी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार व कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू केल्या.

आठवडाभरापासून राजकीय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले होते, परंतु अविश्वास प्रस्ताव जिंकण्यासाठी आवश्यक ३४ सदस्यांची जुळवाजुळव करण्यात वेळ लागल्याने प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत होता. अखेर २४ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे तो दाखल केला. यावर १९ सदस्यांच्या सह्य़ा आहेत. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर ३१ सदस्य तीर्थयात्रेला रवाना झाले आहेत. भाजप, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे काही सदस्य युवा शक्ती संघटना व अपक्ष सदस्य या प्रस्तावाला अनुकूल असल्याची माहिती आहे.