मोदी सरकारविरोधात विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावात शिवसेनेची भूमिका काय असेल, हा संभ्रम कायम आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने संकेत दिले आहेत. ‘जनतेच्या छाताडावर बंदुका रोखणारी ही अर्थव्यवस्था हुकूमशाहीच्या मार्गाने जाणार असेल तर त्यावर फुले उधळण्यापेक्षा आम्ही जनतेच्या न्यायासनासमोर उभे राहून पापक्षालन करू’, असे यात म्हटल्याने शिवसेना भाजपाविरोधात जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

शुक्रवारी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. सत्ताधारी भाजपाकडे संख्याबळ असल्याने सरकारला कोणताही धोका नाही. मात्र, शिवसेना, बिजू जनता दल यासारखे पक्ष कोणाला साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुरुवारी शिवसेनेने भाजपाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतल्याचे सुरुवातीला समोर आले. शिवसेनेने खासदारांसाठी पक्षादेश जारी केल्याचे वृत्तही समोर आले. मात्र, संध्याकाळी खासदार अरविंद सावंत यांनी असा कोणताही पक्षादेश काढला नसल्याचा दावा केल्याने शिवसेनेच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला. शुक्रवारी सामनाच्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपाला फटकारले आहे. शिवसेना भाजपाविरोधात जाणार अशी चर्चा सामनाच्या अग्रलेखामुळे सुरु झाली आहे.

शिवसेना नेता संजय राऊत यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही सकाळी साडे दहा ते अकरा दरम्यान अविश्वास प्रस्तावासंदर्भात पक्षाची भूमिका काय असेल, याचा निर्णय घेऊ. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले.

शिवसेना भाजपाविरोधात जाणार, सामनातून संकेत
भारतात बकऱ्या वाचवून माणसांना मारणारे ‘कसाई’ राज्य करतात. सगळा माणुसकीशून्य कारभार सुरू आहे. फक्त निवडणुका जिंकण्यासाठी व सत्ता टिकवण्यासाठीच डोंबाऱ्याचा खेळ करीत राहणे ही लोकशाही नाही. बहुमताची झुंडशाही सदासर्वकाळ टिकत नाही. जनता सर्वोच्च आहे, असं शिवसेनेने म्हटले आहे.

नाणारमधील रिफायनरीचे गॅस चेंबर रोखा असे ओरडून सांगणाऱ्या जनतेच्या छाताडावर बंदुका रोखणारी ही अर्थव्यवस्था हुकूमशाहीच्या मार्गाने जाणार असेल तर त्यावर फुले उधळण्यापेक्षा आम्ही जनतेच्या न्यायासनासमोर उभे राहून पापक्षालन करू, असंही यात म्हटले आहे.

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या विकृतीने केलेले राज्य लोकांच्या अविश्वासाला पात्र ठरले आहे. काश्मीर, जनतेसाठी ‘अच्छे दिन’, महागाई, नाणार प्रकल्प अशा सर्वच स्तरांवर जनतेच्या पाठीत फक्त खंजीरच खुपसले गेले, असंही शिवसेनेने म्हटले आहे. अग्रलेखातील या विधानांनी शिवसेना भाजपाविरोधात जाणार की काय, अशी चर्चा रंगली आहे.