निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : सोन्याचे वाढते दर तसेच टाळेबंदी दरम्यान सर्वाचेच आर्थिक गणित कोलमडल्याने सोने व चांदी दागिन्यांच्या विक्रीमध्ये कमालीची घट झाल्याचे दिसून येते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सराफा व्यावसायिकांतर्फे विविध योजना काढल्या जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. काही ठिकाणी हप्ते पद्धतीने सोन्याची विक्री सुरू आहे. ग्राहकांची जमवाजमव करताना सराफा व्यवसायिकांची दमछाक होताना दिसत आहे.

टाळेबंदीनंतर शासनाने सर्व विक्रीची दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी सराफा बाजार हा आजही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. यामागची विविध कारणे आहेत. सराफा व्यावसायिकांकडे दागिने घडवण्यासाठी असलेले कारागीर हे विशेषत: कलकत्ता, पश्चिम बंगाल या ठिकाणचे असल्याने टाळेबंदीमध्ये मूळ गावी गेलेले कारागीर व कामगार पुरेशा रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने अजूनही परतलेले नाहीत. याचा मोठा फटका सराफा बाजारावर बसत आहे. ग्राहकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतलेले दागिने आठ महिन्यांनंतरही कारागिरांअभावी ग्राहकांना देता येत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी आहे.

टाळेबंदीनंतर मार्च ते ऑक्टोबर या आठ महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात कमालीची वाढ झाली आहे. ही वाढ सुमारे ३२ टक्के इतकी आहे. मार्चमध्ये सोने ३८ ते ३९ हजार रुपये प्रति तोळा होते. आता तो भाव ५१ हजारांच्या आसपास पोचला आहे. त्यातच टाळेबंदीमध्ये सर्वाचेच आर्थिक गणित कोलमडल्यामुळे सोने खरेदी करणे ग्राहकांना जिकिरीचे झाले आहे. दसरा, दिवाळी या सणादरम्यान दहा दिवस आधीपासून सोनेरी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू होत असे मात्र सराफा व्यवसायिकांची सर्व दुकाने सद्य:स्थितीत ओस पडलेली दिसून येतात. काही व्यावसायिकांचा पूर्वापार व्यवसाय असला तरी त्यांचा व्यवसाय हा जुन्या ग्राहकांवरच आधारित आहे तर काही व्यावसायिक विविध योजनांमार्फत ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यानंतरही ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सराफा व्यावसायिक हताश असल्याचे कमलेश जैन सांगतात.

टाळेबंदीपूर्वी होत असलेल्या व्यवसायापेक्षा आता पन्नास टक्केही व्यवसाय झालेला नाही. ऐन सणासुदीच्या काळात सोन्याच्या भाववाढीमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने सराफ व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. हा व्यवसाय चालवणे जिकिरीचे झाले असल्याचे अनेक व्यावसायिकांनी म्हटले आहे. दुकानाचे भाडे, कर्जाचे हप्ते, कर्मचाऱ्यांचे पगार असे अनेक खर्च व्यवसाय चांगल्यारीत्या चालला तर भागवला जातो. मात्र आता व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने हे सर्व खर्च काढायचे कसे या प्रश्नात व्यावसायिक पडल्याचे दिसून येते. या व्यवसायाला उभारी आणण्यासाठी सोन्याचे दर कमी करणे अपेक्षित असल्याचे सराफ व्यावसायिक सांगत आहेत.

वाढते दर, करोनाची झळ यामुळे सोने दागिने खरेदीला सर्व ठिकाणी अल्प प्रतिसाद आहे. यामुळे सराफा व्यावसायिक खूप अडचणीत आले आहेत त्यांचा विचार व्हायला हवा.
– अरुण जैन, उपाध्यक्ष, महाराष्ट्र सराफा असोसिएशन