कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव पंधरा दिवसांवर येवून ठेपला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना जगदंबेच्या दर्शनापासून यंदा वंचित रहावे लागणार आहे. मंदिर संस्थानने पायी चालत येणार्‍या भाविकांना प्रवेशबंदी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा तुळजापूर येथून भवानीज्योत देखील घेवून जाता येणार नसल्याचे तुळजाभवानी मंदिर संस्थानने जाहीर केले आहे. मोजके पूजारी, महंत आणि सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत पूर्वापार प्रथेप्रमाणे सर्व धार्मिक विधींना मान्यता देण्यात आली आहे.

तुळजाभवानी हे साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण पीठ आहे. तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवास १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपूर्वी राज्यभरातील शेकडो नवरात्रोत्सव मंडळ भवानीज्योत घेवून जाण्यासाठी तुळजापुरात दाखल होतात. हलग्यांचा कडकडाट, कुंकवाची मुक्त उधळण आणि आई राजा उदो-उदोचा गगनभेदी गजर अशा भक्तीमय वातावरणात हजारो तरूण तुळजापुरातून  आपल्या गावी भवानीज्योत घेवून जातात. कोरोनाचा वाढता कहर, संक्रमित रूग्णांची दररोज वाढत असलेली संख्या आणि त्यामुळे वाढलेला मृत्यूचा टक्का प्रशासनासाठी सध्या मोठे आव्हान आहे. त्यामुळे यंदा भवानीज्योत घेवून जाण्यासाठी येणार्‍या नवरात्रोत्सव मंडळांवर निर्बंध लादण्यात आले आहेत.

घटस्थापनेनंतर उस्मानाबाद, लातूर आणि परिसरातील जिल्ह्यांसह आंध्र आणि कर्नाटकातून जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येणार्‍या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सवानंतर येणार्‍या कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवाला शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातून देखील लाखो भाविक तुळजापूरला पायी चालत येतात. जगदंबेला दर्शनासाठी मोठ्या श्रध्देने चालत येणार्‍या भाविकांना यंदा भाविकांना येता येणार नाही. उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने पायी येणार्‍या भाविकांना तुळजापूर शहरात प्रवेश दिला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यंदा ऑनलाइन दर्शनावरच भाविकांना समाधान मानावे लागणार आहे.

पूजारी, महंत, मानकरी, सेवेकर्‍यांनाच मंदिर प्रवेश
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिर आणि मंदिर परिसरात गर्दी होवून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून काही उपाययोजना आखल्या आहेत. पूजारी, महंत, मानकरी आणि सेवेकर्‍यांनाच मंदिर प्रवेश दिला जाणार आहे. पूर्व परवानगी घेतलेल्या ५० भाविकांच्या उपस्थितीतच पूर्वापार प्रथेप्रमाणे होणारे कुलाचार व धार्मिक विधी पार पाडले जाणार आहेत. भाविकांनी घरीच राहून तुळजाभवानी देवीची आराधना करावी आणि स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.