शिवेंद्रराजे आणि माझ्यात कोणताही वाद नाही. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्या दोघांमध्येही खूप वाद असल्याचे दाखवण्यात आले. मात्र आमच्यात कोणतेही वाद नसून कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वाद झाले होते. आता झाले गेले सोडून द्या, आमच्यात कोणताही वाद नाही असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली माढा लोकसभा मतदारसंघातील नेते मंडळीची बैठक पार पडली. त्या बैठकीला उदयनराजे देखील उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकाराशी संवाद साधताना उदयनराजे यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. यावेळी उदयनराजे म्हणाले की, सातारा येथे चांगले वातावरण असून तेथील जनता आगामी निवडणुकीत निर्णय घ्यायचा तो घेईल. तसेच लोकसभा निवडणुकीत आघाडी दोनचा आकडयापर्यंत निश्चित जाईल. असे त्यांनी सांगितले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मोदींची लाट पाहण्यास मिळाली. या निवडणुकीत अशी लाट दिसेल का या प्रश्नावर ते म्हणाले की, मला समुद्राची लाट माहिती असून इतर लाटा माहिती नाही. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदीना त्यांनी लक्ष्य केले.