कोर्टाने परवानागी नाकारली असली तरीही गणेश मिरवणुकीत डीजे वाजणारच अशी आक्रमक भूमिका घेणारे उदयनराजे मिरवणुकांच्या दिवशी मात्र गायब होते. गणेशोत्सव मिरवणुकांच्या वेळी डीजे लावणारच अशी घोषणा उदयनराजे भोसले यांनी केली होती. एवढंच नाही तर जब तक हैं जान तब तक डॉल्बी रहेगी असेही त्यांनी सांगितले होते. यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये उदयनराजे भोसले चांगलेच चर्चेत आले होते. मात्र विसर्जनाच्या दिवशी राजे मिरवणुकीत दिसलेच नाहीत त्यामुळे घोषणेचं काय झालं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

साताऱ्यातून डीजे आणि राजे दोन्ही गायब झाल्याचे चित्र रविवारी बघायला मिळाले. गणेशोत्सवाधी भीमगर्जना करत राजेंनी डीजे वाजणारच अशी भूमिका घेतली होती. मात्र प्रत्यक्षात एकाही मंडळाचा डीजे काल वाजला नाही आणि राजेही दिसले नाहीत. सातारा शहरात २३८ नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत. तर संपूर्ण जिल्ह्यात ५ हजाराच्या वर मंडळं आहेत. पण एकाही मंडळाचा डीजे रविवारी वाजला नाही. त्यामुळे नेमकं काय झालं याची चर्चा साताऱ्यात चांगलीच रंगली आहे.

गणेशोत्सवापूर्वी काय म्हटले होते उदयनराजे

सातारा शहरामध्ये एका गणपती आगमनावेळी उदयनराजेंनी तेथे उपस्थित असणाऱ्या गणेश भक्तांना आणि कार्यकर्त्यांशी स्टेजवरुन संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी डॉल्बी लागलीच पाहिजे असे मत व्यक्त केले. ‘२३ तारखेला विसर्जन आहे तेव्हा पाहू काय होतं आणि काय नाही होतं आणि कसं नाही होत. डॉल्बी लागलीच पाहिजे, डेसिबल ठरवणारे कोर्ट आणि पोलिस खाते कोण आहेत? डेसिबल ठरवतात तुमच्या आमच्यासारखे अवली लोक, असे मत उदयनराजे यांनी मांडताच कार्यकर्त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला समर्थन दिले. पुढे बोलताना एक दोन दिवस त्रास झाला तर सहन करायला हरकत नाही असेही ते म्हणाले. आम्ही खरे गणेशभक्त आहोत. गणपतीला त्रास होत नाही तर इतरांना त्रास व्हायचं काही कारणच नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. प्रत्यक्षात त्यांची गर्जना हवेतच विरल्याची चर्चा आता होताना दिसते आहे.