15 December 2019

News Flash

नगर शहरात ढोल-ताशांचाच निनाद, डीजेचे ‘विसर्जन’!

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंडळांनी ‘डीजे’ला पूर्णत: फाटा दिला आणि गणेश प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचे आवाज निनादले.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील तरुण मंडळांनी ‘डीजे’ला पूर्णत: फाटा दिला आणि आज, गुरुवारी गणेश प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचे आवाज निनादले. पारंपरिक वाद्यांचा बहर निर्माण करतच मंडळांच्या कार्यकर्त्यांना मिरवणुकीत जोश निर्माण करावा लागला. परिणामी, गुलालाची उधळणही आटोक्यात आली व काही बडय़ा मंडळांनी आपल्या परंपरेला फाटा देत सकाळीच मिरवणुका काढल्या. पावसाने दिवसभर विश्रांती घेतल्याने मंडळांनाही मिरवणुका थाटात काढता आल्या.
दहा दिवसांच्या मुक्कामासाठी गुरुवारी श्रीगणेशाचे आगमन झाले. नगरकरांनी नेहमीच्या उत्साहात त्याचे स्वागत केले. जिल्ह्य़ात दुष्काळाचे सावट असले तरी गेली काही दिवस झालेल्या पावसावर समाधान मानत गणेशाच्या आगमनाच्या तयारीत मंडळाचे कार्यकर्ते मश्गूल होते. शहराच्या माळीवाडा, गांधी मैदान, चितळे रस्ता, दिल्लीगेट, प्रोफेसर कॉलनी चौक, गुलमोहोर रस्ता, भिंगार, नागापूर परिसरात गणेशमूर्ती, सजावट व पूजेच्या साहित्य विक्रीचे स्टॉल लागले होते. बुधवारी सायंकाळपासूनच हा परिसर गजबजलेला होता. नगर व पुणे जिल्ह्य़ातील ढोल-ताशांची पथकेही आज मिरवणुकीच्या सुपा-या घेण्यासाठी दाखल झाली होती. उत्सवमूर्ती खरेदी करण्यासाठी नगरकर सहकुटुंब या ठिकाणी येत होते. सायंकाळपर्यंत बहुतांशी स्टॉलवरील उत्सवमूर्ती संपल्या होत्या.
शहराचे ग्रामदैवत माळीवाडा विशाल गणेश देवस्थानच्या मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी व त्यांच्या पत्नी वंदना यांच्या हस्ते उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, सचिव अशोक कानडे व पदाधिकारी उपस्थित होते. तालयोगी ग्रुपने या वेळी ढोलवादन केले. डॉ. त्रिपाठी यांनीही ताशावादनाचा आनंद लुटला. देवस्थानच्या वतीने दहाही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
रेंगाळणा-या विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका सायंकाळनंतर काढण्याची परंपरा काही बडय़ा मंडळांनी सुरू केली होती. डीजेला फाटा देताना अनेक मंडळांनी यंदा लवकर प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका सुरू केल्या होत्या. जंगुभाई तालीम मंडळाने तर सकाळीच मिरवणूक काढली. रूद्रनाथ ग्रुपचे ढोलपथक, तेलंगणा राज्यातील पारंपरिक ‘नादस्वरम’चे पथक मंडळाच्या मिरवणुकीत होते. सातभाई गल्ली मित्रमंडळाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीची होती. एकाच रंगाच्या पंजाबी गणवेशात फेटेधारी महिलांचे झांज पथक सहभागी होते. कार्यकर्तेही पांढ-या कपडय़ात होते. पटवर्धन तरुण मंडळाची मिरवणूक भरगच्च होती. रूद्रनाथ ग्रुपच्या १५० कार्यकर्त्यांचे ढोलपथक, सनई-चौघडा, भालदार-चोपदार, घोडेस्वार, टाळ-मृदुंग घेतलेले बालवारकरी, वाघ्या-मुरळी, पिंगळा, वासुदेव आदी लोककला सादर करणारे कलावंतांची पथके आदींचा सहभाग होता.
चौपाटी कारंजावरील विक्रांत मंडळाने सोवळ्यातील पालखीतील गणेश मिरवणुकीची परंपरा जपली आहे. बँडपथक, टिपरी व झांज पथक, महिलांचा सहभाग मोठा होता. महापौर अभिषेक कळमकर यांच्या श्रीयोग मित्रमंडळाने झोपडी कँटीन परिसरातून ढोलपथकासह मिरवणूक काढली. नगर अर्बन बँकेच्या संचालकांनीही फुलांनी सजवलेल्या रथातून बँडपथक, सनई-चौघडा व ढोल पथकाह मिरवणूक काढली होती. तेलीखुंटावरील वीरराजे प्रतिष्ठानच्या मिरवणुकीत रिदम प्रतिष्ठान ग्रुपचे ढोल पथक होते. बुरुडगल्ली तरुण मंडळाच्या मिरवणुकीत बँडपथकासह साडेआठ फूट उंचीची ‘फायबर’ची उत्सवमूर्ती होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.
– गुलालाची उधळण कमी
– ढोल पथकांमध्ये मुलींसह महिलांची संख्येत वाढ
– ढोल पथकांच्या संख्येत वाढीची आवश्यकता
– विक्रांत तरुण मंडळाच्या संकेतस्थळाचे दि. २३ रोजी उदघाटन
-दि. २६ रोजी विद्यार्थ्यांसाठी अथर्वशीर्ष पठण. मंडळ दुष्काळग्रस्तांना मदत       करणार.
– बहुतांशी गणेशमूर्तीचे कारखाने कल्याण रस्त्यावर असल्याने येथे दिवसभर वाहतूक कोंडी
– प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीतून राजकीय नेत्यांची छबी गायब झाल्याने नागरिकांना दिलासा
– मोकाट जनावरांचा मिरवणुकींना अडथळा

First Published on September 18, 2015 3:40 am

Web Title: no dj in procession of lord ganesha in nagar
Just Now!
X