अनुभव नसतानाही इंडिका चालविण्याचा प्रयत्न दोन लहानग्यांच्या जीवावर बेतला. ताबा सुटल्याने ही गाडी आडात पडून या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लोहा तालुक्यातील आष्टूर येथे सोमवारी रात्री हा प्रकार घडला.
आष्टूरचे उपसरपंच यशवंत गुद्धे यांच्याकडे पुण्याहून लक्ष्मण मेहत्रे हे इंडिकातून आले होते. ही इंडिका चालवण्याचा मोह त्यांचा मुलगा बालाजी गुद्धे (वय २५) याला आला. गाडी चालविण्याचा अनुभव नसतानाही नात्यातील चार मुले घेऊन तो गाडी घेऊन निघाला; पण गावालगत असलेल्या आडाजवळ त्याचा ताबा सुटल्याने ही गाडी २५ ते ३० फूट खोल आडात गेली. यात सुमित गुद्धे (वय ४) व प्रतीक गुद्धे (वय २) ही दोन बालके जागीच गतप्राण झाली. गावातील काहींनी जीव धोक्यात घालून पाण्यात उडय़ा मारल्या व चालक बालाजी गुद्धे, रामिलग वाडीकर, नीलेश गुद्धे व निकिता गुद्धे यांना वाचवण्यात यश मिळवले. जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दैव बलवत्तर म्हणूनच नीलेश व निकिता हे बहिण-भाऊ खोल आडात पडूनही बचावले.
बालाजी गुद्धे याचा मुलगा सुमित मात्र ठार झाला. बालाजीला जास्त दुखापत झाली नाही; पण रुग्णालयात तो स्मृतिभ्रंश झाल्यासारखा वावरत होता. या प्रकरणी लोहा माळाकोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दुर्घटनेमुळे आष्टूर गावावर शोककळा पसरली.