करोनाबधित रुग्णांना देण्यात येणारा आहार हा आयुष मंत्रालयांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार देण्यात येतो. या आहाराच्या तक्त्यानुसार महानगरपालिकेच्या कोविड केअर केंद्रात अंडी दिली जात नसल्याची माहिती उघड झाली आहे.

शहरात करोनाबाधितांची संख्या ७०० वर पोहचली आहे. यात सुमारे  ३०० रुग्ण उपचार घेत आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्ण हे मनपाच्या कोविड केअर केंद्र, शासकीय कोविड रुग्णालयात तर काही डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात आहेत. मनपाचे कोविड उपचार केंद्र शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींचे आणि मुलांच्या वसतिगृहात आहे. दररोज शहरातील रुग्णसंख्या वाढत आहे. मनपाच्या कोविड उपचार केंद्रात न्याहारी आणि जेवण पुरविण्याचा ठेका हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीला दिला आहे. सोमवारी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांनी कोविड केंद्रात मुरमुऱ्याचा नाष्टा दिला जातो, तसेच उकडलेले अंडे दिले जात नाही, अशी तक्रार केली होती. या प्रश्नाला आयुक्त सतीश कुलकर्णी समाधानकारक उत्तर देऊ शकले नव्हते. रुग्णांची देखील प्रचंड ओरड याबाबत वाढली आहे.

याबाबत, कोविड केंद्रातील आहाराचा ठेका रेडक्रॉस सोसायटीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेला असल्याची माहिती उघड झाली आहे. आयुष मंत्रालयानुसार, सकाळी चहा, हळद, दूध, गरम पाणी, अंडी, फळे, नाश्ता, दुपारी हळद, दूध, चहा तर जेवणाला दोन्ही वेळा वरण,भात, भाजी, चपाती देण्याच्या सूचना आहेत. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार  रूग्णांना उकडलेली अंडी आणि पौष्टिक नाष्टा देणे हे ठेकेदाराचे कर्तव्य आहे.

शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांना उकडलेली अंडी सकाळी वेळेवर दिली जातात अशी माहिती आहार व्यवस्थापन समितीच्या डॉ.सहेदा अफरोज यांनी दिली.

रेडक्रॉस सोसायटीला त्यासंदर्भात ठेका दिला आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार त्यांनी ठरवून दिलेला आहार दिला पाहिजे. परंतु, जर त्यांनी आहार देण्यात कमीपणा केला  तर त्यांची नोंद घ्यावी लागेल. त्याबाबत आयुक्ताना सूचित केले आहे.

-अभिजित राऊत (जिल्हाधिकारी, धुळे)