निवडणुकीचे काम नको, अशी विनंती करणारे सुमारे तीन हजार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात आले आहेत. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हदगल यांनी सांगितले.
वरच्या श्रेणीचे वेतन घेणारे अनेक अधिकारी निम्न श्रेणीचे काम मिळाले तर उत्तम या मानसिकतेत आहेत. निवडणुकीच्या कामात चूक झाली तर थेट निलंबन पदरी येईल, या भीतिपोटी हे कामच नको असे मानणाऱ्यांची संख्या अधिक असते. निवडणूक कामावर हजर राहण्याचे आदेश रद्द व्हावेत, या मागणीसाठी दररोज होणारी गर्दी अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. राजकीय पक्षाशी संबंध असल्याचे कारण पुढे करीत १००जणांनी निवडणूक कामाचे आदेश रद्द व्हावेत, अशी विनंती केली आहे. बहुतांशी अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्रासह आले आहेत. प्रसूती रजा, बाळ लहान असल्याने हे काम दिले जाऊ नये, असा विनंती अर्ज अनेकांनी केला आहे. निवडणुकीचे काम लागू नये, यासाठी शिफारशी केल्या जात आहेत. अर्जावर एकदाच निर्णय घेतला जाणार आहे.
८७ मुक्त चिन्हांत चप्पल
अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने ८७ मुक्त चिन्हे ठरवली आहेत. यात चप्पल चिन्हाचा समावेश आहे. गाजर, ८ आकडा असणारी काठी अशी नेहमीची काही गमतीची चिन्हे या यादीत असली तरी चप्पल चिन्ह आहे. विशेष म्हणजे ते अगदी कोल्हापुरी बाजाचे आहे.