दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता आमच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर बसता येणार नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शनिवारी राळेगणसिध्दी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. केजरीवाल आमच्या सोबत असतानाच तसा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता, त्यामुळे तो त्यांनाही मान्य असेल असे हजारे म्हणाले.
हजारे म्हणाले, केजरीवाल आमच्या आंदोलनस्थळी आले तर, त्यांना व्यासपीठाखाली बसावे लागेल.  यापूर्वीही अनेक पक्षाच्या प्रमुखांनी आमच्या आंदोलनस्थळी येऊन आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. ते पक्षप्रमुखही आमच्या व्यासपीठावर नव्हते. त्यांनी व्यासपीठाखाली बसून पाठिंबा दिल्याची आठवणही हजारे यांनी यावेळी करून दिली. शनिवारी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आपण त्यांना शुभेच्छा देत असल्याचे सांगत अरविंद चांगले काम करून दाखवील असा विश्वासही हजारे यांनी व्यक्त केला. शपथविधीसाठी दिल्लीस येण्याचा केजरीवाल यांनी आग्रह धरला होता, परंतु मी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जात नाही, त्यामुळे या कार्यक्रमास जाण्याचा प्रश्नच येत नाही. येत्या दि. २३ व २४ ला मी दिल्लीस जाणार असून या दोन दिवसात केजरीवाल यांची भेट घेणार असल्याचेही हजारे यांनी सांगितले.