अर्धवट स्वरूपाचा जनाधार दिला की, ‘युती’मधील मित्र चांगला नव्हता, असे म्हणण्यास वाव राहतो. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण बहुमत द्या, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबादच्या सभेत टीकेचे पहिले लक्ष्य राष्ट्रवादीला केले. ‘राष्ट्रवादी-भ्रष्टवादी’ असे हिणवताना मोदी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची कार्यशैली व उद्देश एकच आहे. कें द्रातून निधी दिल्यास तो येताना फाटक बंद ठेवणारे सरकार देणार का, असा प्रश्न विचारला. शहरातील गरवारे क्रीडा मैदान मोदी यांच्या सभेसाठी खचाखच भरले होते. महाराष्ट्राची अधोगती, कोण-कोणत्या क्षेत्रात हे राज्य कितव्या क्रमांकावर आहे, याचे वर्णन करीत त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न ते विचारत. त्यास प्रतिसाद देताना गर्दीतून ‘काँग्रेस’ असे उत्तर येई. अशा साद-प्रतिसादाच्या वातावरणात मोदी यांनी भाषण केले. मात्र, त्यात शिवसेनेशी युती तुटल्याचा एकही संदर्भ नव्हता. ‘केवळ अर्धवट जनाधार नको,’ असे सांगत काँग्रेसने राज्याचे वाटोळे केले, असा आरोप मोदी यांनी केला. महाराष्ट्र पुढे गेला तरच देश पुढे जाईल. त्यासाठी मी पूर्ण जोर लावेन. पण मी पाठविलेला निधी काँग्रेसचे सरकार असेल तर पोहोचेल का, असा प्रश्न विचारतानाच ‘अन्य’ व्यक्तींचे सरकार आले, तर माझ्याबरोबर व्यासपीठावरही ते बसणार नाहीत. ते राजकीय अपृश्यता पाळतात, अशी टीकाही मोदी यांनी केली. सोलापूरच्या जाहीर सभेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी यांच्या पुढील कार्यक्रमांना हजर न राहण्याचा निर्णय जाहीर केला होता, त्याकडे लक्ष वेधत चव्हाण यांना त्यांनी चिमटा घेतला. मी निधी देईन, पण ते स्वीकारणारे सरकार असावे; नाही तर फाटकच बंद केले जाईल, असेही ते पुढे म्हणाले.
औरंगाबादच्या विकासाच्या अनुषंगानेही काही मुद्दे मोदी यांच्या भाषणात होते. भाषणाच्या सुरुवातीलाच पर्यटनामुळे अगदी चणे-फुटाणे विकणाऱ्यांपासून ते ‘चहावाल्या’पर्यंत सर्वाना कसा लाभ होतो, हे सांगत जगातील पर्यटक औरंगाबादला यावेत, असे वाटत असेल तर शहर स्वच्छही असायला हवे, असेही ते म्हणाले. हा धागा पकडून त्यांनी त्यांची सफाई मोहीमही पुन्हा सांगितली.
लक्षवेधक मोदी
– ‘मराठवाडय़ाच्या पावन भूमीत’ अशी सुरुवात
– भाषणाची पहिली सहा वाक्ये मराठीत
– ‘काळा पैसा कोपऱ्या-कोपऱ्यातून खणून काढू’
– ‘महागाई कमी झाली. पेट्रोल-डिझेलचे भाव उतरले’
– ‘काँग्रेस राष्ट्रवादीची वृत्तीच ‘माल गूल डब्बा गूल’’
– तरुणाईकडून सभास्थळी मोदींचा जयघोष