अतिवृष्टीत पुराचे पाणी गावात शिरून घरांसह, जनावरांचीही वाताहात

रमेश पाटील, वाडा

शनिवारी व रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाडा तालुक्यातील वैतरणा, पिंजाळी व तानसा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने या नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरून अनेकांच्या घरांची वाताहत तसेच पशुजनावरे वाहून गेल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या पूरग्रस्तांची साधी विचारपूस वा त्यांना तात्काळ मदतीचा हात द्यायला अजूनपर्यंत प्रशासनासह लोकप्रतिनिधीही न आल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पिंजाळी नदीकाठी असलेल्या पीक, मलवाडा या दोन गावांतील पन्नासहून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे धान्य, भांडी, संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. बोरांडा, ऐनशेत, गातेस, सांगे, नाणे अशा अनेक गावांतील अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत.

या पूरग्रस्तांच्या नुकसानीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत. पूरहानी होऊन ४८ तासांहून अधिक कालावधी उलटूनही एकाही पूरग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत मिळालेली नाही. वाडा तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघांत विभागला आहे. या तालुक्याला  शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), विष्णु सवरा (विक्रमगड), पांडुरंग बरोरा (शहापूर) हे तीन आमदार व कपिल पाटील (भिवंडी), राजेंद्र गावित (पालघर) हे दोन खासदार लाभूनही संकटात कुणीही मदतीचा हात द्यायला पुढे येत नसल्याने येथील पूरग्रस्तांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

समाजमाध्यमातून पूरग्रस्तांची माहिती सर्वदूर पसरलेली असतानाही तालुक्यातील अडीचशेहून अधिक पूरग्रस्त कुटुंबांना  शासनाकडून कुठलीच आर्थिक मदत मिळालेली नाही, असे येथे सांगितले जात आहे.

जनावरे वाहून गेली, ६००० कोंबडय़ांचा मृत्यू

वैतरणा नदीला आलेल्या महापुरामध्ये गांध्रे येथील प्रभाकर भोईर यांच्या नदीकिनारी असलेल्या तबेल्यातील २४ म्हशी, १७ रेडकू (पारडे), ३ गाई वाहून गेल्या. त्याचप्रमाणे याच नदीकाठी असलेल्या बोरांडे गावातील एका तरुणाच्या दोन पोल्ट्रीमधील सहा हजार कोंबडय़ा पूरपाण्यामुळे गुदमरून मरण पावल्या, तसेच याच नदीकाठच्या कळंभे येथील बबन पटारे यांच्या दोन म्हशी वाहून गेल्या आहेत.

वाडा तालुक्यात झालेल्या पूरपरिस्थितीची दखल घेण्यात आली आहे. पुरामध्ये नुकसान झालेल्या गावांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिलेले आहेत.

– दिनेश कुऱ्हाडे, तहसीलदार, वाडा

पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात माझ्या डोळ्यासमोर माझी संसारोपयोगी भांडी, कपडे वाहून गेले. अजूनपर्यंत कोणीही चौकशीला आलेले नाही.

– संतोष मुकणे, पीक येथील पूरग्रस्त