बोरखेडी टोल नाक्यावर भाजप नेत्या, आमदार शोभा फडणवीस तर मनसर टोल नाक्यावर आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूकदार संघटनांच्या सदस्यांनी बुधवारी रास्ता रोको केला. आंदोलनादरम्यान टोल वसुली बंद होती. मात्र, हे आंदोलन केंद्र व राज्य शासनाविरोधात नसल्याचे शोभा फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर नागपूर- डोंगरगाव- बोरखेडी- जाम हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याने २००२ मध्ये तयार केला. २०१२ पर्यंत या रस्त्याची निगा राखली. २०१७ मध्ये पुन्हा या रस्त्याचे काम होणार होते. मात्र, केंद्रात व राज्यात सत्तेत आलेल्या आघाडी शासनाने या राष्ट्रीय महामार्गावरील ७४ किलोमीटपर्यंतचा भाग चारपदरी करण्याचे कंत्राट कंपनीला दिले. ते पूर्ण केल्यानंतर टोल वसुली सुरू करण्याचा तसेच कन्हान व गवसी मानापूर येथेच टोल नाके लावण्याचा करार होता. प्रत्यक्षात कंत्राटदार कंपनीने फक्त ५८ किलोमीटपर्यंत काम केले व चार नाक्यांद्वारे टोल वसुली सुरू केली. ७४ किलोमीटर कामाचा प्रस्तावित खर्च १ हजार १७० कोटी ५२ लाख होता. कंपनीने बँकेकडून १ हजार ५२ कोटी रुपये कर्ज घेतले. प्रत्यक्षात कंपनीला ३९३ कोटी १ लाख खर्च आला. ७९२ कोटी रुपयांहून अधिक फायदा कंपनीला झाला. ३९८ कोटी ९९ कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त वसुली केली असताना आणखी बावीस वर्षे कंपनीला टोल वसुलीचा अधिकार देण्यात आल्याने पंधरा हजार कोटी रुपयांहून अधिक लूट जनतेची होणार आहे, अशी माहिती शोभा फडणवीस यांनी आंदोलनाप्रसंगी दिली.
हे आंदोलन केंद्र वा राज्य सरकारच्या विरोधात नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. कंपनीने टोल वसुली केली. मात्र, नाक्यांवर प्रसाधन, वैद्यकीय आदी मूलभूत सुविधाही नाहीत. वसुली पूर्ण झाल्याने टोल बंद व्हायला हवेत. मात्र, ही कंपनी मंत्र्यांचेही ऐकत नाही. ही कंपनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाविरोधात हे आंदोलन आहे. कंपनीवर दबाव आणण्यासाठी सुरू केलेले हे जनतेचे आंदोलन आहे. जुन्या आघाडी सरकारने करार करून जनतेची कोटय़वधी रुपयांची वसुलीच्या रूपाने लूट करण्याची मुभा या टोल कंपन्यांना दिली आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला. उलट नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने वसुली पूर्ण झालेले चाळीस टोल नाके बंद केले असून अठरा बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमित काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल वंजारी यांच्या नेतृत्वाखाली मोठय़ा संख्यने ग्रामीण पोलीस तैनात होते.
आंदोलनात वाहतूकदारांचा सहभाग
दरम्यान, टोल मुक्तीच्या आजच्या आंदोलनात बोरखेडी येथे जनता अथवा भाजपचे कार्यकर्ते नाही तर वाहतूकदार सहभागी झाले होते. आज सकाळपासून बोरखेडी व मनसर येथे वाहतूकदारांनी रस्ता रोखून धरला. बोरखेडी येथे टोल नाक्याच्या दोन्ही दिशेने सुमारे दीड किलोमीटपर्यंत ट्रक व जड वाहनांची रांग लागली होती. चंद्रपूरकडून मात्र एसटी बसेस व चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. महाराष्ट्र राज्य ट्रक, बस, टेंपो, ट्रॅक्टर वाहतूक महासंघ, नागपूर ट्रॅकर्स युनिटी, नाग विदर्भ ब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन, ट्रॅव्हल्स असोसिएशन, विदर्भ पेट्रोलियम डिलर असोसिएशन, रिपब्लिकन ड्रायव्हर युनियन या संघटनांचे मन्नू महाराज त्रिवेदी, अमित गुप्ता, महेंद्र लुले, मुजफ्फल अमीन, दयानंद मटकर, राजेंद्र सैनी, बॉबी सैनी, प्रकाश कोठारी, गुरुदयाल पड्डा आदी याप्रसंगी उपस्थित होते. रस्त्यात उभ्या ट्रक्सच्या चालक व वाहकांसाठी न्याहारीची व्यवस्था होती. बंदोबस्तातील स्थानिक पोलिसांसाठी पोळी, डाळ भाजी, वांग्याचे भरीत, अशी भोजनाची व्यवस्था होती. टोल नाक्याच्या बाजूला हा स्वयंपाक सुरू होता. टोल कंत्राटदाराने ही व्यवस्था केल्याचे तेथे तैनात पोलिसांनी सांगितले.