रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई हायकोर्टाकडून अंतरिम दिलासा मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या सुनावणी होणार आहे. दोन जणांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दलच्या मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी अटक केल्यानंतर उशीरा अलिबागच्या सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तिथे कोर्टाने सहा तासांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर गोस्वामी यांना १४ दिवसांची म्हणजेच १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचबरोबर इतर दोन आरोपी फिरोज मोहम्मद शेख आणि नितेश सारदा यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.

दरम्यान, राज्य मानवाधिकार आयोगाने अर्णब गोस्वामी यांच्या अटकप्रकरणी रायगडचे पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाशी संबंधीत कागदपत्रांसह शुक्रवारी सकाळी ११ वाजता हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

पोलीस कोठडी सुनावली नाही

पोलिसांनी अलिबागच्या कोर्टात अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने त्यांची पोलीस कोठडीत चौकशी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. त्यांचे वकील गौरव पालकर यांनी म्हटलं की, आमच्यासाठी हा मोठा विजय आहे. कारण पहिल्याच दिवशी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. आम्ही गोस्वामी यांच्या जामीनासाठी हायकोर्टात अर्ज दाखल केला असून यावर गुरुवारी सुनावणी होईल.