मे महिन्याच्या ६ आणि ७ तारखांना रायगड जिल्ह्यातील विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली. घरांच्या पडझडीबरोबरच शेती आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. या घटनेला आता सात दिवस लोटले असले तरी कृषी विभागाकडून शेती तसेच फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप करण्यात आलेले नाही. कृषी विभागाच्या या गलथानपणामुळे शेतकरी आणि बागायतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नसíगक आपत्ती झाल्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचानामे करून शासनाकडे अहवाल सादर करणे गरजेच असते. मात्र रायगडच्या कृषी अधीक्षक कार्यालयाला याचे काही देणेघेणेच पडलेले नाही. जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानेच आढावा घेण्याची तसदीदेखील कृषी विभागाच्या अधीक्षकांनी दाखवलेली नाही. त्यामुळे आंबा बागायतदार आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आधी निसर्गाने आणि नंतर शासकीय अनास्थेने घेतलाय त्यांचा बळी असे म्हणणाच्यी वेळ रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक आणि शेतकऱ्यांवर आली आहे.
मे महिन्याच्या सहा तारखेला महाड, पोलादपूर आणि माणगाव परिसरात वादळी पाऊस झाला. तर सात मेला खोपोली, कर्जत, सुधागड पाली, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर, म्हसळा या पट्टय़ात वादळी पावसाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे जिल्ह्यातील बागायती शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकासान झाले. आंबा, जांभूळ, केळी, नारळ, फणस, कोकम या पिकांना वादळी पावसाचा फटका बसला. महाड पोलादपूर परिसरातील उन्हाळी शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र सात दिवसांनतर झालेल्या नुकसानीचा आढावा कृषी विभागाकडून घेण्यात आलेला नाही. अखेर खरीप हंगाम आढाव्याची बठक घेताना रायगडचे जिल्हाधिकारी सुंमत भांगे यांना झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची वेळ आली आहे.
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून कृषी विभागाच्या गलथानपणाला सामोर जावे लागले आहे. शेतकरी आणि कृषी विभागात समन्वयच शिल्लक राहिला नसल्याचे बोलले जात आहे. कृषी अधीक्षक कार्यालयात भेटत नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आता या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी केली जाते आहे.
या बाबत विचारणा करण्यासाठी पत्रकारांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला दोनदा भेट दिली. मात्र शेतकऱ्यांप्रमाणे पत्रकारांच्या पदरीही इथे निराशाच आली जिल्हा कृषी अधीक्षक तरकसे हे कामानिमित्ताने बाहेर असल्याचे सांगण्यात आहे. वादळी पावसामुळे काही जिल्ह्यांत नुकसान झाले आहे का, अशी विचारणा केल्यावर ही माहिती तेच देऊ शकतील असे सांगण्यात आले. ते कार्यालयात कधी भेटतील असे विचारल्यावर आत्ता सांगता येणार नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.