लोकसभा निवडणुकीसाठी अवघे दोनच दिवस उरल्याने प्रचारासाठी उमेदवारांची लगीनघाई सुरू असून, सांगलीत झालेल्या मोदींच्या सभेला ग्लॅमरस नेत्यांद्वारे चोख प्रत्युत्तर देण्याचे काँग्रेसचे प्रयत्न असफल ठरण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा आयोजित करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न अयशस्वी ठरले असून, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ग्रामीण भागात सभा आयोजित करून पॅचवर्क करण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सभेला उच्चांकी गर्दी झाली होती. याला चोख उत्तर देण्यासाठी जिल्हा काँग्रेस समितीने राहुल गांधी व शरद पवार यांच्या जाहीर सभेची मागणी प्रदेश समितीकडे केली होती. राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी येत असतानाही सांगलीचा नियोजित दौऱ्यात समावेश करण्यात आलेला नाही. प्रचारासाठी केवळ सोमवार आणि मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ हाती असताना आघाडीच्या वरिष्ठ  स्टार प्रचारकांच्या सभा सांगलीसाठी उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. रविवारी हातकणंगलेसाठी शरद पवार व मुख्यमंत्री चव्हाण यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली असताना सांगलीसाठी मात्र याचे नियोजन होऊ शकले नाही.
मोदी फेव्हरपासून काँग्रेसची व्होट बँक वाचविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दुसऱ्यांदा सांगलीसाठी आमंत्रित करण्यात आले असून जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात मुख्यमंत्र्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या मालगाव व आरग या मिरज तालुक्यातील मोठय़ा गावात जाहीर सभा होणार आहेत. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री सतेज पाटील हेसुद्धा प्रचार सभांत सहभागी होणार आहेत. याशिवाय सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही सभेसाठी निमंत्रित करण्यात आले असले तरी त्यांचा दौरा अनिश्चित आहे. प्रचार सांगतेसाठी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाचारण करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत.
निवडणुकीसाठी आव्हान निर्माण करणाऱ्या महायुतीने सोमवारी प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण, माजी आमदार कांता नलवडे आदींच्या सभांचे आयोजन केले आहे. प्रचारासाठी मिळणाऱ्या अंतिम क्षणापर्यंत वातावरणनिर्मिती कायम ठेवण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसऱ्या बाजूला मतदार केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू असून प्रशासनाने मतदान चिठ्ठय़ा पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारल्याने राजकीय कार्यकर्त्यांचे बरेच श्रम हलके झाले आहेत. मात्र मतदार बाहेर काढून जास्तीतजास्त मतदान कसे होईल हे पाहण्यासाठी कार्यकत्रे चार्ज करण्याचे काम सुरू आहे.