व्यंगचित्रकार आणि चित्रकारांचा सहभाग असलेला ‘‘आमच्या रेषा बोलतात भाषा’’ हा संमेलनात शनिवारी झालेला परिसंवाद सहभागी वक्त्यांच्या रटाळ भाषणाने निरस झाला. भाषणांऐवजी प्रत्येक सहभागी वक्त्याचे चित्रकलेचे प्रात्यक्षिक आणि त्याचे मनोगत /अनुभव असे याचे स्वरूप ठेवले असते तर हा परिसंवाद जास्त रंगतदार झाला असता. त्यामुळे या परिसंवादात रेषा नव्हत्या आणि दिशाही नव्हती. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला आपली भूमिका मांडली.
शि. द. फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात मंगेश तेंडुलकर, भ. मा. परसवाले, चंद्रकांत चन्न्ो, विजयराज बोधनकर, रविमुकुल, अच्युत पालव हे सहभागी झाले होते. परिसंवादाचा समारोप करताना फडणीस यांनी काढलेले चित्र व पालव यांनी रेखाटलेल्या चित्राचा अपवाद म्हणता येईल.
लहान मुलांना बंदिस्त करू नका
लहान मुलांना अभ्यासात आणि पुस्तकात बंदिस्त करू नका, तर त्यांना स्वत:ला व्यक्त करण्याची संधी आणि मोकळीक द्या. त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव द्या, असे आवाहन फडणीस यांनी अध्यक्षीय समारोप करताना केले.
कलावंत स्वत: हरवतो तेव्हा उत्तम कला जन्माला येते, असे परसवाले म्हणाले, तर मुलांवर व त्यांच्या रेषांवर प्रेम करा, त्यांच्या चुका काढू नका, असा सल्ला चंद्रकांत चन्नो यांनी दिला.
बोधनकर म्हणाले, व्यंगचित्रकाराचे काम फक्त हसविणे नाही तर अंतर्मुख करणेही आहे.
मुलांच्या कल्पनेच्या रेषा बंद करू नका, असे आवाहन पालव यांनी केले. चित्र हे शब्दातून सांगावे लागते, याबद्दल रविमुकुल यांनी खंत व्यक्त केली.
हातात कॅमेरा आला आणि ब्रश सुटला
मी पूर्वी चित्र, व्यंगचित्र काढत होतो, पण हातात कॅमेरा आल्यानंतर हातातून कुंचला सटकला त्याची आज खंत वाटते, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका कुंचल्याच्या ताकदीवर सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात वाघाची ताकद निर्माण केली.
साहित्य संमेलन हा आपल्या मातृभाषेचा उत्सव असून, या व्यासपीठावर आल्यानंतर राजकारणी मंडळींनी आपले पक्षभेद व मतभेद विसरून मराठी भाषेसाठी, तिच्या जतन व संवर्धनासाठी काय करू शकतो याचा विचार करावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या शिवसेनेच्या मागणीला सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.