अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरच्या खंडणीप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा सहभाग असल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादीने प्रतिक्रिया दिली आहे. ‘दाऊद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नसून पक्षाची बदनामी करणारे वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिनीवर अब्रूनुकसानीचा खटला दाखल करु’ असे मलिक यांनी म्हटले आहे.

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला एका बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सोमवारी रात्री पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे वृत्त इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा छायाचित्रही वापरला जात होता. यात भर म्हणजे ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत राजकारणी रडारवर असल्याचे संकेत दिले होते. अटकेनंतर ठाण्यातील काही राजकारण्यांचे धाबे दणाणले असे पोलीस आयुक्तांनी म्हटले होते. त्यामुळे या वृत्ताने खळबळ उडाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी संध्याकाळी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांनी दुजोरा किंवा थेट प्रतिक्रिया दिलेली नसतानाही काही वृत्तवाहिन्या दाऊद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संबंध असल्याचे वृत्त देत आहेत. या वृत्तात पक्षाच्या अध्यक्षांचे छायाचित्र वापरण्यात आले. मात्र हे वृत्त निराधार असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि दाऊदचा काहीच संबंध नाही’ असे मलिक यांनी स्पष्ट केले. निराधार आणि खोट्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर काय कारवाई करता येईल यासाठी कायदेशीर सल्ला घेतला जात आहे असे त्यांनी सांगितले.

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून इकबाल कासकरने ३० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी कासकरला अटक केली. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा सहभाग असून संबंधित नगरसेवक हा पक्षातील आमदाराचा निकटवर्तीय आहे असे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ने दिले आहे.