लोकसभा निवडणुकीमध्ये देशात काँग्रेसची मोठी पिछेहाट होऊन धुव्वा उडणार असल्याचे मत चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिरे यांनी व्यक्त केले.
खासदार अहिरे यांनी शनि शिंगणापूर (ता. नेवासे) येथे येऊन शनिदेवाची विधिवत दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने विश्वस्त सयाराम बानकर यांनी  त्यांचा सत्कार केला. या वेळी ते म्हणाले, मला भाजपने एकदा विधान परिषद, तीनदा खासदार व आता पुन्हा लोकसभेची उमेदवारी दिली. संपूर्ण भारत देश ज्यांच्याकडे अपेक्षेने पाहतो असे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या मतदारसंघात उच्चांकी दोन सभा घेतल्या. विदर्भात १० पैकी ९ जागा भाजप-सेना युतीला मिळणार असून राज्यात ३५ पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला.
देशात ५० वर्षांच्या काँग्रेस राजवटीत गरिबांसाठी एकही महत्त्वाकांक्षी योजना राबविली नाही. फ़क्त गरिबांच्या नावाखाली योजना तयार करून काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी आर्थिकदृष्टय़ा बलाढय़ करण्याचे कटकारस्थान केले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर संसदेमध्ये सविस्तर चर्चा न करता अन्नसुरक्षा विधेयक व राजीव गांधी जीवनदायी योजनांची फक्त जाहिरातबाजी केली. याउलट भाजपने मोदी सारखा नवा चेहरा जनतेसमोर आणला व त्यांना जाहीर सभा, प्रचारमाध्यमांमार्फत व वैयक्तिक गाठीभेटी घेऊन मतदारांमध्ये जनजागृती केली. लोकसभेमध्ये सदस्य नव्हेतर सेवक पाठवा व काँग्रेसला ६० वर्षे दिली मला फक्त ६० महिने स्वयंभू सरकार द्या असे आवाहन देशभर केले
मी सदैव जनतेच्या कामामध्ये मग्न राहून त्यामध्येच हरिनामाचा आनंद घेतो व सामान्य जनताच माझ्यासाठी पंढरपूरचे पांडुरंग असल्याचे खासदार अहिरे यांनी सांगितले.