जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉन आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. अ‍ॅमेझॉनने आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा अशी मनसेची मागणी आहे. मात्र, याविरोधात अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली आहे. यामुळे मनसे आक्रमक झाली असून ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ ही नवी मोहिम मनसेनं सुरु केली आहे.

अ‍ॅमेझॉनने सत्र न्यायालयात धाव घेत आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करु शकत नाही, अशी भूमिका मांडली. यानंतर मनसेच्या स्टुडंट विंगच्या अखिल चित्रे यांनी अ‍ॅमेझॉनला सवाल केला आहे. अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा नसेल तर महाराष्ट्रात मराठी माणसांनी अ‍ॅमेझॉनचं अ‍ॅप का वापरावं? असं चित्रे यांनी म्हटलं आहे. तसेच नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन, बॅन अ‍ॅमेझॉन असा हॅशटॅग वापरत इथून पुढे तुमची डिलिव्हरी तुमची जबाबदारी असा इशाराही अ‍ॅमेझॉनला देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील मराठी जनतेकडून अ‍ॅमेझॉनवरुन कोट्यवधी रुपयांची खरेदी केली जाते, त्यातून कंपनीला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो. अ‍ॅमेझॉनचं अॅप वापरायला सोयीचं व्हावं यासाठी त्यांनी आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी अनेकदा ग्राहकांनीही केली आहे. हीच मागणी मनसेने अ‍ॅमेझॉनकडे काही दिवसांपूर्वी लावून धरली होती. सुरुवातीला याबाबत आपण विचार करु असं म्हणणाऱ्या अ‍ॅमेझॉनने पलटी खात थेट कोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर नाही केला तरी चालतो, असा कोणताही कायदा नाही, असा युक्तीवाद अ‍ॅमेझॉनने कोर्टात केला आहे.

अ‍ॅमेझॉनने कोर्टात धाव घेतल्याने आता मनसेची वकिलांची टीमही सज्ज झाली आहे. त्याचबरोबर ‘तुमची डिलिव्हरी, तुमची जबाबदारी’ अशा शब्दांत अ‍ॅमेझॉनला इशारा दिला आहे.