सोलापूर : विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. केंद्रातील मोदी सरकारला साडेतीन वर्षे तर राज्यातील फडणवीस सरकारला आता कोठे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र कोणताही राजकीय मुद्दा नसल्यामुळेच विरोधकांकडून लोकसभा व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांची हूल उठविली जात आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केली.

शुक्रवारी दुपारी सोलापुरात भंडारी आले होते. त्या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेजारच्या गुजरात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतरही महाराष्ट्र विधानसभेला व लोकसभेला बराच कालावधी शिल्लक राहिलेला असताना मध्यावधी निवडणुका घ्यायच्या कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.

सोलापुरात पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटात उफाळलेल्या संघर्षांकडे लक्ष वेधले असता त्यावरही भंडारी यांनी सावध उत्तर दिले. दोन्ही देशमुखांनी पक्षवाढीसाठी भरीव काम केले आहे. त्यामुळे पक्षाला मोठा लाभ झाला आहे. त्यांच्यात कोठे मतभेद असतील, तर पक्षांतर्गत आहेत. त्यावर जाहीर वाच्यता करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.