एक खासदार, चार आमदार देणाऱ्या सांगलीला मंत्रिमंडळ विस्तारात पुन्हा ठेंगाच दाखविण्यात आला असून पुढच्या विस्ताराचे गाजर मात्र दाखविण्यात आल्याने नाराजी पसरली आहे. मंत्रिमंडळात सांगलीला स्थान मिळाले नसल्याने राजकीय महत्त्व कमी झाल्याची भावना सर्वच राजकीय पक्षातील कार्यकत्रे व्यक्त करीत आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला लाल दिवा मिळेल अशी अपेक्षा होती. भाजपाचे कमळ काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा फुलविणारे आणि तिस-यांदा विक्रमी मतांनी विजय संपादन करून विधानसभेत जाणारे सुरेश खाडे यांना या वेळी मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता होती. याशिवाय शिराळ्याचे शिवाजीराव नाईक यांना युती शासनावेळचा अनुभव लक्षात घेऊन मंत्री केले जाईल अशी चर्चा होती. दोघांचीही नावे भाजपाच्या कोठय़ातून आघाडीवर होती.
शिवसेनेने सरकारमध्ये सहभागी व्हावे यासाठी चच्रेच्या फेऱ्या सुरू असतानाही पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला तळागाळात पोहोचण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मानाचे पान देण्याची मान्य करण्यात आले होते. मात्र अखेरच्या क्षणी दोघांची नावे वगळण्यात आली. सुरेश खाडे हे सुद्धा काल रात्रीपर्यंत शपथविधीसाठी बोलावणे येईल अशा अपेक्षेत होते. मंत्रिमंडळात समावेश होत नाही असे स्पष्ट झाल्यानंतर शपथविधीलाही ते गेले नाहीत.
भाजपाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी निवडणुकपूर्व युती केली असून या संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मंत्री केले जाण्याची चिन्हे होती. खोतही सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या मरळनाथपूरचे असल्याने किमान त्यांच्या रूपाने तरी सांगली जिल्ह्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ हटेल ही आशा सुद्धा आज फोल ठरली. पुन्हा होणाऱ्या विस्तारात तरी सांगलीची वर्णी लागणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.