भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराचा पराभव केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजयी प्रतिक्रिया दिली आहे. विजयाबद्दल येथील जनतेचे आभार त्यांनी मानलेच मात्र विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार त्यांनी यावेळी मानले. तसंच २०१४ च्या निवडणुकांप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीची लाट आता नाहीये अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.

पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियामध्ये नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी या सरकारच्या विरोधात रोष मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळाला. त्यातील प्रामुख्याने कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड चीड असल्याचे जाणवले, असं ते म्हणाले. याशिवाय पालघर निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी समविचारी पक्ष एकत्र आले असते तर तेथेही चित्र वेगळं दिसलं असतं, असं म्हटलं.

नाना पटोले यांनी भाजपाच्या पक्षनेतृत्वावर टीका करत खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक लागली होती. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे हे उमेदवार होते तर भाजपाने हेमंत पटले यांना उमेदवारी दिली होती. नाना पटोले यांनी कुकडेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. नाना पटोले आणि भाजपासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यात अखेर नाना पटोले यांनी बाजी मारली. पहिल्या फेरीपासून राष्ट्रवादीचे कुकडे हे आघाडीवर होते. कुकडेंनी ४० हजारांहून अधिक मतांनी पटलेंचा पराभव केला. महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदासंघात पोटनिवडणूक होती. भाजपाला त्यातील पालघरची एकच जागा राखता आली.