गेले काही दिवस सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा कांदा दर गडगडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हय़ातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये मंगळवारी कांद्याचे भाव प्रति क्विंटलला पुन्हा एकदा ६०० ते ८०० रुपयांनी कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करीत लिलाव बंद पाडले.
शासनाने साठेबाजांवर कारवाई करण्याचा इशारा दिल्यापासून सुरू झालेली घसरण गेल्या पंधरवडय़ापासून कायम आहे. यापूर्वी कांदा भाव प्रति क्विंटलला सुमारे हजार रुपयांनी गडगडला होता. धास्तावलेल्या शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपल्याकडे शिल्लक असणारा कांदा विक्रीसाठी आणण्याचा सपाटा लावल्याने ही स्थिती निर्माण झाली. पिंपळगाव बाजार समितीत भावातील ही घसरण ६०० रुपयांची होती. शेतकरी आक्रमक झाल्यामुळे लिलाव थांबविण्यात आले. या संदर्भात व्यापारी, बाजार समितीचे संचालक व शेतकरी यांची बैठक झाली. त्यानंतर लिलाव पूर्ववत होऊन क्विंटलला सरासरी ३,४०० रुपये भाव मिळाला.