गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. तसेच हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने उस्मानाबादमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा दुर्देवी प्रकार नुकताच घटला. या घटनेनंतर खा. छत्रपती संभाजीराजे यांनी संताप व्यक्त करत आरक्षण गेलं खड्ड्यात; पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत करा, अशी मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.

उस्मानाबादमधील देवळाली या गावातील मराठा समाजातील शहाजी देवकर या युवकाने आपले आयुष्य संपवले. त्याला 94 टक्के गुण मिळूनही त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नव्हता. याचाच दाखला देत संभाजीराजे यांनी सर्वांना मोफत शिक्षण देण्याची मागणी केली. 94 टक्के गुण मिळूनही प्रवेश न मिळणे ही गंभीर बाब आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुले अतोनात कष्ट घेऊन गुणांची कमाई करीत असतील आणि तरी त्या गुणवत्तेला न्याय मिळत नसल्याने माझ्या मनात संतापाची भावना आहे. यासाठी किमान बारावी पर्यंतचे शिक्षण मोफत करावे. राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजसह सर्व घटकांना आरक्षण दिले होते, त्यांच्या कार्याची अनुकरण केले पाहिजे. मला सरकारला दोष द्यायचा नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना दिली.

त्यांच्या ट्विटनंतर अनेकांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया आल्या. दहावीत 94 टक्के मार्क असलेल्या एका मराठा विद्यार्थ्याने अकरावीत चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही म्हणून आत्महत्त्या केली. त्यामुळे उद्विग्न होऊन खासदार संभाजी यांनी हे ट्विट केले. आरक्षण संपवल्याने अशी स्थिती येणार नाही हा त्यांचा समज झालेला दिसतो, असे मत एका नेटकऱ्याने व्यक्त केले. अनुसूचित जातीचाच कट ऑफ 95 टक्के आहे. या मुलाला 94 टक्के होते. त्यामुळे खा. संभाजीराजे भोसलेंचा आरक्षणावरील राग अनावश्यक आहे, असेही मत एकाने व्यक्त केले आहे.