रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकही नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून आलेला नाही. तसेच रूग्णालयात उपचारांसाठी दाखल रूग्णांपैकी ९ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

या दिलासादायक घडामोडींमुळे जिल्ह्यात एकूण करोनाबाधित रूग्णांपैकी बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्के झाले आहे.

दरम्यान सोमवारी  दोन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुळे मृत व्यक्तींची संख्या २१ झाली आहे. यापैकी शिरगाव (ता. रत्नागिरी) येथील पुरुष रुग्णाला (वय ६५ वर्षे) किडनी व मधुमेहाचा आजार होता, तर काडवली (ता. संगमेश्वर) येथील महिला रुग्ण (वय ४२ वर्षे) मुंबईहून येथे आलेली होती.

येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात असलेल्या करोना चाचणी प्रयोगशाळेतील यंत्रणेत रविवारी बिघाड झाल्यामुळे गेल्या २४ तासांत एकही अहवाल मिळू शकला नाही.  सोमवारी संध्याकाळी ही यंत्रणा दुरूस्त झाली आहे.  सध्या रुग्णालयात १०६ करोनाबाधित रूग्णांवर उपचार चालू आहेत.

करोना विषाणूबाधित क्षेत्र जाहीर

रत्नागिरी शहरातील मच्छी बाजार आणि ओसवालनगर, रत्नागिरी तालुक्यातील मुसलमानवाडी – गोळप आणि संगमेश्वर तालुक्यातील रिंगीची वाडी-निरूळ ही चार ठिकाणे ‘करोना विषाणू बाधित क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहणार असून त्या सेवांशी संबंधित व्यक्ती व कर्मचारी वगळता इतरांना ये-जा करण्यास मनाई आहे.

सिंधुदुर्गात आणखी १३ रुग्ण करोनामुक्त

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी १३ रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात तंदुरुस्त झालेल्या रुग्णांची संख्या १३० झाली आहे.  जिल्ह्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १६० झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५ सक्रीय रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मेपासून आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख चार हजार ८९६ चाकरमानी आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.