राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय राज्य घटनेला सुरुवातीपासूनच विरोध चालविला आहे. संघाच्या मर्जीप्रमाणे देश कदापी चालू शकणार नाही. हिंदूराष्ट्र निर्माण करण्याचा खटाटोप संघाने चालविला असला तरी त्यांच्या हिंदूराष्ट्रवादाची संकुचित संकल्पना कोणालाही मान्य होणार नाही. देशात विविध जाती, धर्म, पंथांचे लोक गुण्यागोविंद्याने पिढय़ान्पिढय़ा राहतात. ही सर्वसमावेशकता जपण्यासाठी आणि देशाची प्रगती करण्यासाठी राज्य घटनेने धर्मनिरपेक्षता स्वीकारली आहे. त्यामुळेच देशाची प्रगती झाली, असे मत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.

सोलापुरात रविवारी आल्यानंतर दलवाई यांनी काँग्रेस भवनात एका पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. गेल्या पाच-सहा वर्षांत देशात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर असले तरी प्रत्यक्षात कारभार मोदींपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मर्जीनुसार चालतो. म्हणून हा कारभार मोदी चालवितात की भागवत, असा प्रश्न निर्माण होतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

१९५० साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाची राज्य घटना तयार होत असताना त्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मतदानाचा अधिकार सर्वच भारतीय नागरिकांना देऊ नये, केवळ शिक्षित आणि आयकर भरणाऱ्या नागरिकांपुरताच मतदानाचा अधिकार मर्यादित ठेवावा, अशी मागणी केली होती. त्यांची ही मागणी जर मान्य केली असती तर आज देशात कोणाचे राज्य चालले असते, याचा विचार केलेला बरा. धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आदी तत्त्वे राज्य घटनेने स्वीकारल्यामुळे देशाची प्रगती झाली, हे कोणीही नाकारू शकत नाही. धर्मनिरपेक्षता ही केवळ मुस्लीम, ख्रिश्चनांचे लाड करण्यासाठी स्वीकारली गेली नाही, तर सर्वाना सोबत घेऊन एकसंध देश निर्माण करायचा आहे, देशाची प्रगती करायची आहे, तरुण पिढीचे भवितव्य घडवायचे आहे. सर्वाना समान अधिकार द्यायचे आहेत, यासाठी धर्मनिरपेक्षता स्वीकारली गेली. धर्माची सार्वजनिक जीवनात लुडबूड चालणार नाही, हे तत्त्व स्वीकारले गेल्यामुळेच देशाची प्रगती होऊ शकली. सर्वसमावेशक अशा राज्य घटनेला संघाचा सुरुवातीपासूनच विरोध असल्याचेही दलवाई यांनी नमूद केले. मोहन भागवत यांनी नागरिकत्व सुधारणा व नागरिकत्व नोंदणी कायद्याला कोणीही कितीही विरोध केला तरी हे कायदे अमलात आणले पाहिजेत, असे विधान केले आहे. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.

सावरकरांनी दिलेले योगदान विसरता येणे अशक्य

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी देशासाठी केलेला त्याग मोठा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी सावरकरांच्या मुद्यावर सावध भूमिका मांडली आहे. सावरकरांच्या माफीनाम्यासंबंधी कोणताही वाद निर्माण होऊ नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानातील तुरुंगात पाठवा, असा इशारा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रामुख्याने काँग्रेसजनांना उद्देशून केला होता. नंतर त्यांनी सारवासारवही केली आहे. यासंदर्भात भाजप तथा संघ परिवाराने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न चालविला असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेमध्ये शिवसेनेचा भागीदार काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दलवाई यांच्या विधानाद्वारे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी बोलण्यावर संयम ठेवावा, असा सावधपणाचा सल्लाही दलवाई यांनी दिला आहे. भाजपचे हिंदुत्व आणि शिवसेनेचे हिंदुत्व यात फरक आहे. शिवसेनेने वेळोवेळी काँग्रेस पक्षाला मदतच केली आहे. आणीबाणीला देखील शिवसेनेने उघड पाठिंबा जाहीर केला होता, असेही दलवाई यांनी सांगितले.