भीमा-कोरेगावच्या तपासात केंद्र सरकारचा अधिकारही कोणी नाकारलेला नाहीय; पण तो अधिकार गाजवताना त्यांनी राज्याला विश्वासात घ्यायला हवं होतं असं मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

“आमचं काय चुकतंय हे सांगायला हवं होतं. चुका लक्षात आणून देणं हाही केंद्राचा अधिकार आहे. आमचा तपास समजा अयोग्य दिशेने चालला असेल तर तो योग्य दिशेने कसा होईल हेही त्यांनी सांगायला हवं होतं. दिशा म्हणजे एकतर्फी असं नाही. पण राज्याच्या तपास यंत्रणांवर केंद्राचा विश्वास नाही का? हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्याचे संबंध विचित्र अवस्थेत जातात” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भीमा-कोरेगावच्या प्रकरणात “मला आश्चर्य वाटतंय की, केंद्राने हा निर्णय घेण्यापूर्वी राज्यास विचारायला हवं होतं. पोलिसांकडून, तपास यंत्रणांकडून नेमका काय काय तपास चाललाय याचा आढावा ते घेऊ शकले असते” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आणखी वाचा – महाविकास आघाडीचं भविष्य काय? उद्धव ठाकरे म्हणतात…

महाविकास आघाडीबद्दल उद्धव ठाकरे म्हणतात…
महाविकास आघाडीच्या भवितव्याबद्दल बिलकूल चिंता करू नका. महाविकास आघाडीच्या बरोबरीने महाराष्ट्राचं भवितव्यही उज्ज्वल आहे असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. आपण सत्तेमध्ये एकत्र आहात.

सत्तेसाठी एकत्र राहाल…पण ही महाविकास आघाडी भविष्यातसुद्धा पुढे जाईल का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “जायला काय हरकत आहे? आणि न जावं असं कारण काय? जर तिघांनी एकमेकांच्या मर्यादा ओळखल्या असतील आणि तशा त्या ओळखल्या आहेतच, तर आपल्या मर्यादेमध्ये जास्तीत जास्त टप्पा किंवा दरमजल सहज साध्य करू शकतो. पण एखादा आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काही करायला गेला तर तो आपटतो…”